Monday, October 18, 2021

कोळेश्र्वर ते कमळगड ट्रेक १७.०१.२१

 

 कोळेश्र्वर ते कमळगड ट्रेक १७.०१.२१

 

९-१० जानेवरीचा रायरेश्वर- कोळेश्वर- ऑर्थरसीट पॉइंट, महाबळेश्वर असा लांबलचक ट्रेक पावसामुळे रद्द करावा लागला. पण लगेचच १७ जाने चा कोळेश्र्वर - कमळगड हा त्याच भागातला ट्रेक ठरला. रविवारी ठरल्याप्रमाणे पहाटे ४ वाजता दांडेकर पुलावर(pick up) जाऊन थांबलो. बरोब्बर ४.२० ला बस पकडली आणि पुढचे pick up घेत घेत बस लगेचच पुणे बंगलोर हायवेला साताऱ्याच्या दिशेने निघाली. वाई येई पर्यंत मस्त झोप झाली. वाईच्या गणपतीचे दर्शन घेऊन, जोर ह्या कोळेश्र्वर च्या पायथ्याच्या गावी ८.३० ला पोचलो. इथे आमच्या ग्रुप लीडरने ट्रेकची संपूर्ण माहिती दिली आणि ९ वाजता आम्ही डोंगर यंगायला सुरुवात केली. सुरवातीलाच जबरदस्त घामटे काढणारी चढाई होती. ऊन खूप होतं पण झाडी खूप असल्यामुळे ते तितकेसे जाणवले नाही. कुठेही जराशी पण सपाट सरळ वाट नव्हती, सतत चढण. पण कुठेही न थांबता आणि पाण्याचा एक थेंबही न पीता, ही चढाई आम्ही १.३० तासात पूर्ण केली.




वर आल्यावर, झाडांच्या सावलीत बसून आधी मनसोक्त पाणी प्यायलो आणि मग पोटपूजा केली. तो पर्यंत मागे राहिलेली मंडळी थोड्या थोड्या वेळाने येत होती. सगळे वर येई पर्यंत थोडी विश्रांती घेतली, फोटो काढले.  वर नजर जाईल तिथपर्यंत झाडी भरलेले पठार होते.  सकाळचे ११ वाजले होते. खाली आमच्या लीडरने सांगितले होते की कोळेश्र्वर पठार आणि कमळगड मधे एक खिंड आहे. तिथं पर्यंत जर आपण ३/३.३० पोचलो तरच कमळगडावर जाऊन येता येईल अन्यथा कमळगड बघण्याचा विचार सोडावा लागेल. म्हणून मग आमच्या वाटेपासून जरा बाजूला असलेल्या कोळेश्र्वर मंदिरात जाण्याचा विचार बाजूला सारला.




इथून पुढे भरगच्च जंगलाने वेढलेले लांबलचक कोळेश्र्वर पठार होते. असंख्य प्रकारची नैसर्गिकरीत्या उंच उंच वाढलेली झाडं होती, वेली होत्या, खूप साऱ्या पांढऱ्या फुलांची पखरण होती, उंचीची तमा न बाळगता वाढलेली कारवीची जंगले होती, लांबवर पसरलेले फर्न वनस्पतीचे जंगल होते, मधूनच पक्षांचे आवाज येत होते. माणसाचा मात्र जराही मागमूस नव्हता. वाटेत एका झर्यावर मस्त थंडगार पाणी प्यायलो आणि आमच्या रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. मी तर अर्धी झालेली बिसलेरी ची बाटली ओतून झऱ्याचे रुचकर थंड पाणी भरून घेतले.



अडीचतास कुठंही ब्रेक न घेता चालत, १.३० वाजता आम्ही धनगर वाडीत पोचलो. डोळ्यांना सुखावणारी, लांबवर पसरलेली सोनेरी, पोपटी गव्हाची शेतं होती. मधोमध त्यांची कौलारू घरं होती. अगदी फोटो परफेक्ट जागा होती, त्यामुळे ह्या ठिकाणी फोटो न काढणारा विरळाच. शेताच्या एका बाजूला खळ्यासाठी मोकळी जागा होती, तिथे सगळ्यांनी डबे उघडुन मस्त पोटपूजा केली. आता २ वाजले होते. पुढचा खिंडी पर्यंतचा टप्पा लवकर पार करायचा होता. मग काय, वेगवान चालीने डोंगर वाटा पार करत, जिथे दोन वाटा दिसतात तिथे मागून येणाऱ्या लोकांसाठी, चुकीची वाट झाडांच्या वाळक्या फांद्यांनी बंद करत, हातातल्या खडूंनी वाटेतल्या दगडांवर योग्य मार्ग दर्शवत, झाडांवर मार्ग दर्शक रीबिनी बांधत,  तास सव्वा तासात खिंडीत पोचलो. (एक लिहायचे राहिले, जोर गावातून आम्ही एक डोंगर मित्र बरोबर घेतला होता जो आम्हाला वाट दाखवत होता).






वाटेत एका ठिकाणाहून, इतक्या वेळाने कमळगडाचे प्रथम दर्शन झाले. खिंडीतून गडावर जाऊन, खिंडीत परत येण्यासाठी दीड तास पुरेसा आहे. वाटेत आधी एक गोरखनाथांचे सुरेख मंदिर लागते आणि पुढे गड चढण्याआधी एकुलती एक झोपडी लागते. इथे राहण्याची/जेवणाची व्यवस्था, तेथील शेतकरी कुटुंब करते.

साधारण ४२०० फूट उंचीच्या ह्या किल्ल्याला प्रवेशद्वार किंवा बुरुज वगेरे असे काहीही नाही. वर जमीन चिरत गेलेले ४०-५० फूट खोल असे एक भुयार आहे, तीच गेरूची किंवा कावेची विहीर. खाली उतरायला पन्नासेक उंच पायऱ्या आहेत. बाजूला एक जाड लोखंडी तार बांधली आहे, ज्याला धरून आपण विहिरीत उतरू शकतो. पायऱ्या ओलसर गेरू मुळे थोड्या घसर्ड्या आहेत. खाली उतरत जाताना थंडावा वाढत जातो.  तळाशी पोचल्यावर बऱ्याच कपारी दिसतात ज्यात गेरुची लाल ओलसर माती दिसते. विहिरीतून वर आल्यावर हात गेरुमुळे लालेलाल होतात.


गडावरून दिसणारा नजरा केवळ अप्रतिम. महाबळेश्वर पाचगणी चा परिसर, भोवतालची अतिशय दाट जंगले, रायरेश्वर चे पठार, केंजळगडचे नयनरम्य दर्शन होते. गडाच्या तिन्ही बाजूंनी धोम धरणाचा तर एका बाजूने बलकवडे धरणाचा जलाशय दिसतो.




वरती अर्धा पाऊण तास थांबून, आलेल्या वाटेने अर्ध्या तासात परत खिंडीत पोचलो. अजुन बरेच लोक येणे बाकी होते. आमच्या वाटाड्याला बरोबर घेऊन, मागच्या लोकांसाठी खडूने/झाडांना मार्ग दर्शक रिबिनी बांधत तासाभरात, बरोब्बर ४.३० वाजता खालच्या नांदवणे गावात पोचलो.



समोर मस्त जलाशय होता. मग काय मस्त थंडगार पाण्याने फ्रेश झालो. काही जणांना डुंबायचा मोह आवरला नाही. बाकीची मंडळी अजुन वरून येत होती. बाजूला एक छोटेसे सुंदर मंदिर होते. दर्शन घेऊन, तिथल्या पारावर निवांत बसलो. आजूबाजूचा परिसर खूपच रमणीय होता. सगळी मंडळी आल्यावर, मस्त गरमागरम चहा घेऊन, ६.३० ला पुण्याकडे मार्गस्थ झालो.

आमचा हा जो ट्रेकिंग ग्रुप आहे, ते बहुतांश घाट वाटांचे ट्रेक करतात. मलाही सह्याद्रीतील घाटवाटा अनुभवायला खूप आवडतात. घाटवाटा बरोबरच तिथले निसर्ग सौंदर्य, वाटावरची जंगलं, प्राणी, पक्षी, त्यांचे आवाज, झुळझुळते झरे, त्यांचे थंडगार गोड मिठास पाणी, वाटांवर भेटलेले मदतीसाठी तत्पर असलेले साधे डोंगरातले लोक, त्यांचा आपलेपणा खूप भावतो.

आंबी, काळ आणि वेळवंडी रिव्हर ट्रेल १०.१०.२१

 

आंबी, काळ आणि वेळवंडी रिव्हर ट्रेल १०.१०.२१

 

हा एकदम जबरदस्त तगडा ट्रेक. हा ट्रेक करताना आपल्याला तिन्ही नद्यांच्या खोऱ्यामधून मार्गक्रमणा करावी लागते. नांदेड सिटी, पुणे येथून आमचा शेवटचा  पीकअप घेत आमची Sahyatdri Trekkers Foundation(STF) ची बस सकाळी ४.४५ ला मार्गस्थ झाली. त्याआधी जरा फ्लशबॅक. सकाळी बरोब्बर ४ वाजता माझा मित्र धनंजय, याने मला बाणेरहून त्याच्या motorcycle वर pick up केले. पण आम्ही जेमतेम ५०० मीटर जातो न जातो तोच गाडी पंक्चर झाली (वेळ ४.१५). परत आमच्या सोसायटीत येऊन गाडी लावली आणि cab book केली. ती येई पर्यंत वेळ ४.२५. आमचा नांदेड सिटीचा पीकअप होता ४.४५ चा आणि आमच्या इथून अंतर १६ किमी. म्हणलं आता ट्रेक विसरा, बस जाणार. पण सकाळची वेळ असल्याने, traffic नसल्याने ड्रायव्हर ला request केली गाडी पळवायची. आम्ही कसेबसे वेळेत पीकअप पॉइंटला पोचलो. Cab चे बिल देईपर्यंत बस आली.                                              

                                       



सकाळी पानशेत धरणाच्या बॅकवॉटरवर, अतिशय निसर्गरम्य वातावरणात थोडी फोटोग्राफी करत शिरकोली, तालुका वेल्हे येथे पोचलो तेव्हा सकाळचे ७.३० झाले होते. गावाभोवती अतिशय सुंदर देवराई आहे. येथेच शिरकाई देवीचे अतिशय सुंदर मंदिर आहे. प्रशस्त आवार, नवरात्र असल्यामुळे छान सजवलेले. देवीची मूर्ती देखील अतिशय सुबक आणि सुरेख. STF तर्फे देवीची आरती करून, प्रसाद घेतला. (दरवर्षी नवरात्रात STF चा हा ट्रेक असतो त्यावेळी इथे आरती करूनच ट्रेकची सुरुवात होते). मंदिर परिसरातच नाश्ता करून पुढे मानगाव, ता. वेल्हा इथून ट्रेकला सुरुवात केली तेव्हा सकाळचे सव्वा नऊ झाले होते. 





हा ट्रेक अतिशय तगडा आहे ह्याचे कारण म्हणजे संपूर्ण ट्रेकचे अंतर जरी १३.५ किमी असेल तरी भरपूर चढाई आहे. जवळपास पाच डोंगर पार करावे लागतात. मधे पांच water bodies पण पार कराव्या लागतात. दरम्यान आपण जवळ जवळ हजार अकराशे मीटर्स पर्यंत hike करतो. ह्या ट्रेकचा मार्ग, मानगाव (वेल्हा तालुका)- चांदर- मोहरी- हारपुड असा निसर्ग संपन्न आहे. आमच्या नशिबाने ह्यावर्षी कारवी फुलण्याचा काळ (कारवी दर ७-८ वर्षांनी फुलते) असल्यामुळे  मार्गावर सर्वत्र कारवी फुलली होती. काही झाडे कळ्यांनी लगडलेली होती तर काहीं जांभळ्या फुलांनी. अजुन पावसाळा चालू आहे. पण ऊन पडायला सुरुवात झाली की सगळी फुले फुलतील आणि सगळ्या डोंगरावर/पायवाटांवर जांभळ्या रंगाची उधळण होईल. खूप मनोहारी दृश्य असेल ते. आताही काही वाटांवर कारवीने जांभळ्या कमानी धरल्यात trekkers मंडळी/वाटसरूसाठी. डोंगरमाथ्यावरून दुर्गराज रायगड, त्यावरील जगदीश्र्वराचे मंदिर आणि टकमक टोक ह्यांचे दूरदर्शन होते. कोकणदिवा आणि बंदिगृह लिंगाणा ह्या गडांचेही दर्शन होते.



दुपारी एकदीडच्या सुमारास आम्ही चांदर ह्या गावात पोचलो. तीनचारच झोपडीवजा घरं होती. तिथून एका मुलाने खाली नदीत उतरण्याची पायवाट आम्हाला खालपर्यंत येऊन दाखवली. नदीत खडकांवर बसून, कर्णमधुर खळाळत्या पाण्याचा आवाज ऐकत थोडी पोटपूजा केली. पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि पुढे मोहरीकडे चढाई सुरु केली. मधे पावसाला सुरुवात झाली. लगेच रेन जॅकेट्स चढवली. सुदैवाने ह्या ट्रेक मध्ये जळवा नव्हत्या. मोहरीत पोचलो तेव्हा ३.३०/३.४५ झाले होते. ह्या गावातूनच पुढे बोराट्याची अवघड नाळ उतरून लिंगाण्यावर जाता येते.


 


मोहरीत पोचल्याबरोबर इतका जोरदार पाऊस सुरू झाला की आता पुढे लागणाऱ्या ओढ्याला/नदीला भरपूर पाणी लागणार होते. अजुन अश्या ३ वॉटरबॉडीज आम्हाला पार करायच्या होत्या. पाऊस मेघगर्जनेसह तासभर चालू होता. आम्ही डोंगर माथ्यावरच्या जोरदार पावसात, अगदी अरुंद पायवाटेने आणि दोन्ही बाजूला असलेल्या भरगच्च कारवीतून उतरायला सुरुवात केली. वाट अतिशय अडचणीची होती. बरेचसे लोक इथे घसरले. जंगलात वरून कोसळणाऱ्या पावसाचा आणि खाली वाहत असलेल्या पाण्याचा घनघोर आवाज आसमंतात घुमत होता. कारवीच्या, वाऱ्यापावसाने तुटलेल्या फांद्या उतरताना आडकाठी आणत होत्या, पाठीला/चेहऱ्याला फटकारे मारत होत्या. डोक्यावर पावसाचा तडंमताशा चालू होता. डोंगरांमधून वाहणाऱ्या असंख्य ओहोळांनी आता धबधब्याचे रुप धारण केले होते. मनात भीती वाढत होती खाली नदी/ओढ्याला पाणी वाढण्याची. मागचा २ वर्षापूर्वीच्या पावसाळ्यातल्या दूधसागर ट्रेकच्या आठवणी जाग्या होत होत्या. भाऊंनी दोर बरोबर आणला होताच. (सकाळीच ट्रेक सुरु होण्यापूर्वीच भाऊंनी सांगितले होते की आत्ता जरी लख्ख ऊन असेल तरी दुपारी ३/४ नंतर पाऊस 100% असणार. तेव्हा ज्या लोकांना मोठ्या ट्रेकची सवय नाही त्यांनी इथूनच बसबरोबर डेस्टिनेशनला जावे कारण वाटेतून माघार नाही). पण सुदैवाने तीनही ठिकाणी पाणी फार वाढले नव्हते त्यामुळे दोर लावायची गरज पडली नाही. एकमेकांच्या साह्याने आम्ही ते दोन्ही ओढे आणि वेळवंडी नदी पार केली. शेवटचा छोटासा डोंगर पार करत आम्ही ५ वाजता हारपुड गावात पोचलो. गाव खूप लहानसे. लोकसंख्या दिडएकशे. गावातल्या मंदिरातच गरमागरम पुलाव आणि बुंदी रायता खाऊन वर मस्त चहा पिऊन ६.३० पुण्यासाठी निघालो. ट्रेक खूपच अविस्मरणीय झाला. शारीरिक क्षमतेचा चांगलाच कस लागला. त्यामुळे बसमध्ये मस्त झोप घेत रात्री १०.३० ला पुण्यात पोचलो.

Vivek Phatak

Monday, September 27, 2021

कोळेश्वर ट्रेक १९.०९.२१ (जांभळी गावाकडून)

 

कोळेश्वर ट्रेक १९.०९.२१ (जांभळी गावाकडून)

  

खरं म्हणजे मी ह्याच दिवशीच्या दुसऱ्या ट्रेकला जाणार होतो. पण आदल्या दिवशीच विशालचा ह्या ट्रेक बद्दलचा मेसेज आला. हा TTMM ट्रेक (म्हणजे ट्रेकचा खर्च सर्व participant मधे विभागून) होता. शिवाय बरोबर नेहमीची मित्र मंडळीही होती. त्यामुळे बुक केलेला ट्रेक कॅन्सल करून ह्या ट्रेकला जॉईन झालो. आमचा १४ जणांचा ग्रुप होता. 

१८ तारखेला सकाळी औरंगाबादहून रवाना झालो आणि बाणेरला पोचलो तेव्हा सध्याकाळचे ६ वाजले होते. बस रात्री ११.३० ला निघणार होती. माझ्याकडे वेळ भरपूर होता. ट्रेकसाठी सॅक तयारच होती, ती थोडी व्यवस्थित भरली, थोडा आराम करून रात्री १०.३० बाणेरहून निघून बस पीकअप पॉइंट(मॅकडोनाल्ड, JM रोड) ला पोचलो तेव्हा ११ वाजले होते. दुसऱ्या दिवशी अनंत चतुर्दशी होती, त्यामुळे बाजूलाच असलेल्या गणपती मंडळात चाललेली लगबग बघत, गणपती दर्शन घेऊन होईस्तोवर बस आली. पुढचे pickup घेत साधारण १२ वाजता बस सातारा रस्त्याला लागली आणि वाई मार्गे रात्री २.३०  वाजता जांभळी ह्या पायथ्याच्या गावात पोचली. 




बसमध्येच ५.३० वाजे पर्यंत झोप काढली. बाहेर अंधार आणि वातावरण ढगाळ होते. Weather App वर ह्या भागात thunderstorm ची warning दिलेली होती. बस गावातल्या देवळाजवळ थांबली होती. सगळं आवरून, थोडी पोट पूजा केली. गावात चहाची व्यवस्था झाली. चहा पिऊन ७.३० वाजता आम्ही ट्रेक सुरु केला. आम्ही ज्या बाजूने जायला निघालो होतो, तिकडून न जाता भात खाचरे पार करत एका काकांनी आम्हाला योग्य वाटेला लावले. कारण त्यांच्या मते आम्ही ठरवलेल्या मार्गात बंधाऱ्याच्या सांडव्यावरून पाणी वाहतय आणि बरीच निसरडी जागा आहे,
पाय सटकायची भीती होती.




 असो. त्यांनी सांगितलेल्या वाटेने आम्ही पठार चढायला सुरुवात केली. आता ढग बऱ्यापैकी विरळ झाले होते. जांभळी बंधाऱ्याच्या कडेकडेने जंगलातून आमचे मार्गक्रमण चालू होते. वाट हळू हळू वर चढत होती. कास पठारासारखे हे पठार यायला सोपे आणि प्रसिध्द नसल्यामुळे इथे फक्त ट्रेकर्सच येतात पण त्यांची संख्याही कमीच असते. त्यामुळे वर जाणाऱ्या पायवाटा सततच्या पावसामुळे आणि अस्ताव्यस्त वाढलेल्या झाडांमुळे/कारवीमुळे पटकन सापडत नव्हत्या. त्यामुळे काही ठिकाणी अस्ताव्यस्त माजलेल्या झाडांमधून त्यांच्या काटेयुक्त फांद्या बाजूला करून वाट शोधत जावे लागत होते. गुगल बाबाची पण मदत होती. खाली ओल्या मातीमुळे जळवांचा सुळसुळाट होता. हे आम्हाला खूप वेळाने समजले. तो पर्यंत त्यांनी आपला कार्यभाग साधला होता. काही बुटावर, काही मोज्यांवर तर काही पायावर विराजमान होत्या. आमच्या ग्रुप पैकी एक दोघे सोडले तर सर्वांना त्यांनी आत्तापर्यंत लक्ष केले होते. तन्मयने त्यांच्या वर dettol चा प्रयोग केला आणि तो कमालीचा यशस्वी झाला. जळू चिकटली असेल त्या ठिकाणी dettol चे दोन तीन थेंब टाकल्या बरोब्बर जळू सर्रकन पायावरून घसरून पडायची. मग चिकटलेल्या ठिकाणी हळद लावली की रक्त थांबायचे. डेटॉल टाकल्यावर ती ज्या वेगाने खाली घसरायची तो क्षण व्हिडिओत बंदिस्त करण्यासारखा होता. त्या ॲक्टिविटीचे तन्मय ने माझ्याच पायावर चित्रीकरण केले. पण तो रक्तरंजित व्हिडिओ प्रदर्शित केला नाही.😁😁

                                                             

                                                                                

                                   

                                                                       


वर जाणारी वाट चांगलीच दमावणारी होती. पण आजुबाजूचे वातावरण फारच निसर्गरम्य होते. मधेच थांबत, थोडं पाणी पीत, फोटो काढत जळवांना चुकवत (हो!! आत्ता जमिनीवरही बारीक लक्ष्य ठेऊन होतो कारण पावसामुळे जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्याने करडा रंग धारण केल्याने जळवा पटकन दिसत नव्हत्या ना म्हणून) वर चढत होतो. समोर रायरेश्वर पठार, केंजळगड आणि आम्हा दोघा मधले धोमधरणाचे पाणी सतत साथ देत होते. वेगवेगळ्या angle ने त्यांचे मोहक रूप आम्हाला फोटो काढण्यासाठी संमोहित करत होते.                                                                  

                                                                                 

                                                                            

                                                                                                              

                                                                           


एव्हाना जांभळी गावातून निघून २.५/३ तास होत आले होते. वर चढणारी वाट आणि चढ काही संपायचे नाव घेत नव्हता. कारवी च्या दाट जंगलातून मोकळे आकाश दिसायला लागले की वाटायचे आता आले पठार. पण लगेच एक वळण यायचे की परत वर जाणारी वाट. असे मधेच दिसणाऱ्या मोकळ्या आकाशाने दोन तीनदा हुल दिली. अगदी फायनल स्टेजला पठारावर चढण्यापूर्वी आम्ही वाट चुकलो. पुढे गेलेलो परत मागे येत, दाट गवतातून विशाल आणि दिलीप सरांनी वाट शोधली. पठारावर चढण्यापूर्वी फायनल hike आधी लागणारी खिंड आणि त्यात खोदलेल्या पायऱ्या बघून आश्चर्य वाटते. सकाळी ७.३० वाजता सुरू केलेली कोळेश्वरची चढाई करायला तीन तास लागले.                                                                                      

                                                                            

                                                                        

                                                             

                                                             


पठारावर पोचल्यावर दिसणारा नजारा अतिशय अप्रतिम होता. सभोवार हिरवागार गालिचा पसरला होता, पिवळी आणि छोटी छोटी जांभळी फुले वाऱ्यावर डुलत होती. समोर दरीत धोम धरणाचा पसारा, डावीकडे रायरेश्वर पठार आणि दिमाखदार केंजळगड, उजवीकडे लांबवर दिसणारा कमळगड. सगळे कसे हिरव्यागार गालीचाने नटलेले. अतिशय शुध्द आणि आल्हाददायक हवा. सकाळी दिसलेले ढग आता कुठेच दिसत नव्हते. इथे मस्त अर्धा तास time pass आणि पोट पूजा केली. डूलणाऱ्या छोट्या जांभळ्या फुलांचे VDO केले. परत एकदा बूट मोजे काढून जळवा चेक केल्या. खालून दरीतून एक मामा वर येत होते. ते वर आल्यावर, ते त्यांच्या जवळच असलेल्या झोपडी वजा घरात घेऊन गेले. त्यांच्याकडून काही जणांनी मध घेतला. मामा आम्हाला कोळेश्वर मंदिरापर्यंत घेऊन गेले आणि पुढची वाट दाखवून परत फिरले. मंदिर अतिशय दाट झाडीत वसलंय. चारी बाजूंनी २-३ फुटांच्या कच्चा भिंती आहेत. मंदिराला छत नाही. मध्यभागी महादेवांचा मुखवटा आहे.                                                             

                                                              


                                                                    

                                                             

                                                                        

तिथून परत पठारावरची वाटचाल सुरू केली. बारा वाजून गेले होते. पुढची वाट दाट जंगलातून, कारवीच्या गचपनातून, वेड्यावाकड्या वाढलेल्या शेवाळ दाटलेल्या झाडांच्या असंख्य फांद्यातून होती. वाट मधेच हरवत होती, थोडी शोधाशोध केल्यावर परत सापडत होती. मी जानेवारी २१ मधे हा ट्रेक, जोर गावातून वर चढून, कोळेश्वर पठार - कमळगड आणि नांदगणे गावात उतरणे असा केला होता. पण पुढे फर्न वनस्पतीचे लांबचलांब पठार पार करे पर्यंत वाटेची ओळख लागत नव्हती. त्या वेळी आम्ही, कमळगड करायचा म्हणून कोळेश्वर मंदिरात गेलो नव्हतो. 

                                                          

                                                          


पठाराचा हा भाग लांबपर्यंत फर्न वनस्पतीने व्यापलेला आहे. त्यामुळे जरा मोकळं आकाश दिसायला लागले. ऊन नव्हतच. आता दाट जंगल ही नव्हते. सरळसोट पायवाट होती. आदिवासी लोकांची १/२ घरं लागली. एका घराच्याजवळ असलेल्या मोठ्या झाडाखाली विशालने सॅक टाकली आणि तो आडवा होणार इतक्यात मला तिथे जळू दिसली. लगेच आम्ही मुक्काम हलवला आणि पुढे निघालो. वाटेत माकडांची एक टोळी भेटली. चांगली मोठ मोठी ७-८ माकडे होती. पुढे अजुन एक झोपडी लागली. कुत्र्यांनी भुंकून भुंकुन आमचे स्वागत केले. समोर मोकळी जागा होती. जळावांचा मागमूस नव्हता. म्हणून मस्त गोल रिंगण करून शिदोरी सोडली. देवाण घेवाण करत मस्त जेवण झाले. तिथल्या मावशींनी मस्त ताक करून आणले. त्यांना योग्य मोबदला देऊन पुढे निघालो.                                                           


३.३० वाजून गेले होते. आता पुढचे टार्गेट कोळेश्वर-कमळगड ची खिंड होती. दमदार चाल करत ४.३० वाजता खिंडीत पोचलो. कमळगड प्रत्येक वळणावर साथ देत होता आणि जवळ जवळ येत होता. बलकवडे धरण पण दृष्टिपथात आले होते. पाणी खूप गढूळ दिसत होते. याउलट धोमचे पाणी मात्र स्वच्छ होते. खिंडीत आम्ही काही जण रेंगाळलो कारण आता कमळगड करून परत खाली पोचेपर्यंत खूप उशीर होणार होता त्यामुळे कमळगड ड्रॉप केला होता. 

                                                   

                                                                    

                                                               

                                                   

खिंडीतून डावीकडे कमळगड ची वाट होती आणि उजवीकडे दोन वाटा होत्या. एक वाट थोडी वरची आणि दुसरी पहिलीच्या डावी कडची. आमच्यातल्या काही जणांनी खाली गावात उतरायला सुरुवात केली होती. आम्ही त्या ठिकाणी आलो तर हे लोकं ऑलरेडी गेले होते. रेंज मिळाल्यामुळे आम्ही त्यांना कॉल केला आणि त्यांचा ठावठिकाणा विचारला. त्यांनी उजवीकडे वळा आणि मग डावीकडे असे सांगितले. आम्ही उजवीकडे वळून वरची वाट पकडली कारण ती जरा मोठी आणि जास्त मळलेली वाटत होती. आम्ही १५-२० मिनिटे पुढे गेलो पण कोणीच दिसेना.  वातावरण थोडेसे ढगाळ झाल्यामुळे आणि संध्याकाळ होत आल्यामुळे थोडा अंधार व्हायला लागला होता. त्या वाटेत झाडोरा पण खूप होता. त्यातच बिबट्या फॅमिलीचे ताजे pugmarks दिसले. नुकतेच संपूर्ण कुटुंब तिथून गेले असावे. थोडी टरकली होती पण pugmarks चे ठसे तर हवेच म्हणून पटापट फोटो घेतले. आपण वाट चुकतोय हे लक्षात यायला लागले. आम्ही आवाजही देत होतो बाकीच्यांना. त्यांचा रिस्पॉन्स अस्पश्ट येत होता आणि खालून येत होता. आम्ही वाट चुकलो होतो. मागे खिंडीतून दोन वाटा उजवी कडे जात होत्या त्यात आम्ही गल्लत केली. त्यातली डावी वाट घ्यायच्या ऐवजी उजवी घेतली आणि चुकलो. परत १५ मिनिटे मागे गेलो आणि योग्य वाट पकडली. १० मिनिटे चालून गेल्यावर मंडळी भेटली. थोडी मस्करी झाली. 

                                                      


                                                                              


समोर बलकवडे धरणाचा नजारा मस्त दिसत होता. ५ मिनिटे थांबून पुढे निघालो. पाच वाजले होते. पुढे १.३० तासात सतत पाय चालवत, बलकवडे धरण प्रत्येक वळणावर बघत, फोटो काढत नांदगणे गावात उतरलो. गावात नुकतेच गणपती विसर्जन झाले होते. विसर्जन करून परतणाऱ्या बायाबापड्या आवर्जून आम्हाला प्रसाद देत होत्या. गावातल्या देवळाच्या पायरीवर गावातले बापे मंडळी विसर्जनाचा शिर्याचा प्रसाद वाटत होते. तिथे बरीच गर्दी होती गावकऱ्यांची. आम्हाला अगदी आग्रह करून प्रसादाचा भरपूर शिरा प्रत्येकाला दिला. गावकऱ्यांचा तो गोड आग्रह मोडवला नाही. मंदिर जवळच धरणाचे पाणी होते. तिथे आम्ही सगळे फ्रेश झालो. काही मंडळींना पोहायचा मोह आवरला नाही. फ्रेश होऊन सगळे बसमध्ये स्थानापन्न झाले. वाटेत वाईला एका हॉटेलवर मस्त जेवण केले आणि ट्रेकच्या आठवणी घोळवत पुण्याकडे प्रस्थान केले. रात्री १२ वाजता घरी पोचलो. सकाळी ७.३० ते संध्याकाळी ६.३० अशी जवळपास १०-११ तासांची मस्त पायपीट झाली पण ट्रेक यशस्वीरीत्या पार पडल्यामुळे ते लक्षातही आले नाही.