Monday, October 18, 2021

आंबी, काळ आणि वेळवंडी रिव्हर ट्रेल १०.१०.२१

 

आंबी, काळ आणि वेळवंडी रिव्हर ट्रेल १०.१०.२१

 

हा एकदम जबरदस्त तगडा ट्रेक. हा ट्रेक करताना आपल्याला तिन्ही नद्यांच्या खोऱ्यामधून मार्गक्रमणा करावी लागते. नांदेड सिटी, पुणे येथून आमचा शेवटचा  पीकअप घेत आमची Sahyatdri Trekkers Foundation(STF) ची बस सकाळी ४.४५ ला मार्गस्थ झाली. त्याआधी जरा फ्लशबॅक. सकाळी बरोब्बर ४ वाजता माझा मित्र धनंजय, याने मला बाणेरहून त्याच्या motorcycle वर pick up केले. पण आम्ही जेमतेम ५०० मीटर जातो न जातो तोच गाडी पंक्चर झाली (वेळ ४.१५). परत आमच्या सोसायटीत येऊन गाडी लावली आणि cab book केली. ती येई पर्यंत वेळ ४.२५. आमचा नांदेड सिटीचा पीकअप होता ४.४५ चा आणि आमच्या इथून अंतर १६ किमी. म्हणलं आता ट्रेक विसरा, बस जाणार. पण सकाळची वेळ असल्याने, traffic नसल्याने ड्रायव्हर ला request केली गाडी पळवायची. आम्ही कसेबसे वेळेत पीकअप पॉइंटला पोचलो. Cab चे बिल देईपर्यंत बस आली.                                              

                                       



सकाळी पानशेत धरणाच्या बॅकवॉटरवर, अतिशय निसर्गरम्य वातावरणात थोडी फोटोग्राफी करत शिरकोली, तालुका वेल्हे येथे पोचलो तेव्हा सकाळचे ७.३० झाले होते. गावाभोवती अतिशय सुंदर देवराई आहे. येथेच शिरकाई देवीचे अतिशय सुंदर मंदिर आहे. प्रशस्त आवार, नवरात्र असल्यामुळे छान सजवलेले. देवीची मूर्ती देखील अतिशय सुबक आणि सुरेख. STF तर्फे देवीची आरती करून, प्रसाद घेतला. (दरवर्षी नवरात्रात STF चा हा ट्रेक असतो त्यावेळी इथे आरती करूनच ट्रेकची सुरुवात होते). मंदिर परिसरातच नाश्ता करून पुढे मानगाव, ता. वेल्हा इथून ट्रेकला सुरुवात केली तेव्हा सकाळचे सव्वा नऊ झाले होते. 





हा ट्रेक अतिशय तगडा आहे ह्याचे कारण म्हणजे संपूर्ण ट्रेकचे अंतर जरी १३.५ किमी असेल तरी भरपूर चढाई आहे. जवळपास पाच डोंगर पार करावे लागतात. मधे पांच water bodies पण पार कराव्या लागतात. दरम्यान आपण जवळ जवळ हजार अकराशे मीटर्स पर्यंत hike करतो. ह्या ट्रेकचा मार्ग, मानगाव (वेल्हा तालुका)- चांदर- मोहरी- हारपुड असा निसर्ग संपन्न आहे. आमच्या नशिबाने ह्यावर्षी कारवी फुलण्याचा काळ (कारवी दर ७-८ वर्षांनी फुलते) असल्यामुळे  मार्गावर सर्वत्र कारवी फुलली होती. काही झाडे कळ्यांनी लगडलेली होती तर काहीं जांभळ्या फुलांनी. अजुन पावसाळा चालू आहे. पण ऊन पडायला सुरुवात झाली की सगळी फुले फुलतील आणि सगळ्या डोंगरावर/पायवाटांवर जांभळ्या रंगाची उधळण होईल. खूप मनोहारी दृश्य असेल ते. आताही काही वाटांवर कारवीने जांभळ्या कमानी धरल्यात trekkers मंडळी/वाटसरूसाठी. डोंगरमाथ्यावरून दुर्गराज रायगड, त्यावरील जगदीश्र्वराचे मंदिर आणि टकमक टोक ह्यांचे दूरदर्शन होते. कोकणदिवा आणि बंदिगृह लिंगाणा ह्या गडांचेही दर्शन होते.



दुपारी एकदीडच्या सुमारास आम्ही चांदर ह्या गावात पोचलो. तीनचारच झोपडीवजा घरं होती. तिथून एका मुलाने खाली नदीत उतरण्याची पायवाट आम्हाला खालपर्यंत येऊन दाखवली. नदीत खडकांवर बसून, कर्णमधुर खळाळत्या पाण्याचा आवाज ऐकत थोडी पोटपूजा केली. पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि पुढे मोहरीकडे चढाई सुरु केली. मधे पावसाला सुरुवात झाली. लगेच रेन जॅकेट्स चढवली. सुदैवाने ह्या ट्रेक मध्ये जळवा नव्हत्या. मोहरीत पोचलो तेव्हा ३.३०/३.४५ झाले होते. ह्या गावातूनच पुढे बोराट्याची अवघड नाळ उतरून लिंगाण्यावर जाता येते.


 


मोहरीत पोचल्याबरोबर इतका जोरदार पाऊस सुरू झाला की आता पुढे लागणाऱ्या ओढ्याला/नदीला भरपूर पाणी लागणार होते. अजुन अश्या ३ वॉटरबॉडीज आम्हाला पार करायच्या होत्या. पाऊस मेघगर्जनेसह तासभर चालू होता. आम्ही डोंगर माथ्यावरच्या जोरदार पावसात, अगदी अरुंद पायवाटेने आणि दोन्ही बाजूला असलेल्या भरगच्च कारवीतून उतरायला सुरुवात केली. वाट अतिशय अडचणीची होती. बरेचसे लोक इथे घसरले. जंगलात वरून कोसळणाऱ्या पावसाचा आणि खाली वाहत असलेल्या पाण्याचा घनघोर आवाज आसमंतात घुमत होता. कारवीच्या, वाऱ्यापावसाने तुटलेल्या फांद्या उतरताना आडकाठी आणत होत्या, पाठीला/चेहऱ्याला फटकारे मारत होत्या. डोक्यावर पावसाचा तडंमताशा चालू होता. डोंगरांमधून वाहणाऱ्या असंख्य ओहोळांनी आता धबधब्याचे रुप धारण केले होते. मनात भीती वाढत होती खाली नदी/ओढ्याला पाणी वाढण्याची. मागचा २ वर्षापूर्वीच्या पावसाळ्यातल्या दूधसागर ट्रेकच्या आठवणी जाग्या होत होत्या. भाऊंनी दोर बरोबर आणला होताच. (सकाळीच ट्रेक सुरु होण्यापूर्वीच भाऊंनी सांगितले होते की आत्ता जरी लख्ख ऊन असेल तरी दुपारी ३/४ नंतर पाऊस 100% असणार. तेव्हा ज्या लोकांना मोठ्या ट्रेकची सवय नाही त्यांनी इथूनच बसबरोबर डेस्टिनेशनला जावे कारण वाटेतून माघार नाही). पण सुदैवाने तीनही ठिकाणी पाणी फार वाढले नव्हते त्यामुळे दोर लावायची गरज पडली नाही. एकमेकांच्या साह्याने आम्ही ते दोन्ही ओढे आणि वेळवंडी नदी पार केली. शेवटचा छोटासा डोंगर पार करत आम्ही ५ वाजता हारपुड गावात पोचलो. गाव खूप लहानसे. लोकसंख्या दिडएकशे. गावातल्या मंदिरातच गरमागरम पुलाव आणि बुंदी रायता खाऊन वर मस्त चहा पिऊन ६.३० पुण्यासाठी निघालो. ट्रेक खूपच अविस्मरणीय झाला. शारीरिक क्षमतेचा चांगलाच कस लागला. त्यामुळे बसमध्ये मस्त झोप घेत रात्री १०.३० ला पुण्यात पोचलो.

Vivek Phatak

1 comment:

  1. खुपच छान फोटोज आणि ट्रेक वर्णन. आम्ही पण तुमच्याबरोबरच ट्रेक करतोय असा 'फिल' आला.

    ReplyDelete