आंबेनळी घाटाने उतराई आणि मढे घाटाने चढाई
ट्रेक २९.०५.२०२२
तीन वर्षापूर्वी ऐन पावसाळ्यात जुलै महिन्यात शिवथर भागातील गोप्याघाट केला होता. ह्याच भागातील घाटमाथ्या वरून कोकणात उतरणाऱ्या इतरही घाटवाटा जसे उपांड्या, मढे, आंबेनळी, शेवत्या खुणावत होत्या. त्यापैकी ह्या दोन घाटवाटा करायची संधी आमच्या ट्रेक ग्रूपमुळे मिळाली. २८ तारखेला रात्री ११.३० ला पुण्यातून निघून वेल्हा तालुक्यातील केळद गावी पोचलो तेव्हा रात्रीचे २/२.३० झाले होते. केळद हे ५००/५५० लोकवस्तीचे छोटेसे पण अतिशय टुमदार गाव. जवळच असलेल्या मढेघाट ह्या पर्यटन केंद्रामुळे, विशेषतः पावसाळ्यात वाहणाऱ्या येथील अजस्र धबधब्यानमुळे आणि तेथे चालणाऱ्या waterfall rapelling मुळे हे गाव अतिशय लोकप्रिय आहे.
गावातील विठ्ठल रखुमाई देवळाच्या प्रशस्त आवारात अर्ध्या तासात फ्रेश होऊन, पाठ पिशवी व्यवस्थित भरून ट्रेक साठी सज्ज झालो. तो पर्यंत आमचा वाटाड्या रामभाऊ पण आला. गावातल्या समस्त श्र्वानांच्या यथेच्छ भुंकण्याच्या पार्श्वभूमीवर ट्रेकसाठीच्या सगळ्या पूर्वसूचना देऊन झाल्यावर, रात्री ३ च्या सुमारास ट्रेकची सुरुवात झाली.
सुरवातीच्या कच्च्या रस्त्यावरून सुरुवात होऊन हळू हळू आम्ही जंगलातल्या पायवाटेला लागलो. जंगलात बऱ्याच ठिकाणी काजवा महोत्सव अनुभवायची संधी मिळाली. हातातल्या आणि डोक्यावरील विजेर्या विजवून, गच्च अंधारात हा सुंदर अनुभव घेतला. झाडावर बसलेल्या काजव्यांमुळे, संपूर्ण झाडच चमचमत होते. पण इथे जास्त वेळ न दवडता आम्ही पायवाटेने पुढे निघालो.
पण, हाय रे दैवा!! आम्ही वाट चुकलो. अंधारात आमचा वाटाड्या गंडला. थोडासा खळग्या खळग्यांचा भाग वाटत होता, बहुतेक ओढा असावा. तिथेच ग्रुपने जागा मिळेल तिथे बसकण मारली आणि अर्धा पाऊण तास डुलकी घेतली. आमच्यातल्या दोघा तिघांनी अर्धा पाऊण तास जंगलात फिरून योग्य मार्ग शोधला. तीच होती ही अतिशय निमुळती तीव्र उताराची, मातीपासून सुटलेल्या दगडांची आंबेनळी घाटवाट.
दोन्ही बाजूने किर्र जंगल. उतरताना छोटे छोटे दगड निसटून खाली घरंगळत
होते. प्रत्येक जण आपल्या कुवतीप्रमाणे घसरत घसरत ही फारशी वापरात नसलेली वाट उतरत
होते. पहाटे ४.३०/५ वाजता उतरायला सुरुवात केलेली ही वाट, साधारण ७५% उतरल्यावर आम्ही
उजवीकडे traverse घेतला कर्णवडी गावाकडे जाण्यासाठी, तेव्हा सकाळचे ६ वाजले होते. पुढे
वाट खाली तळ कोकणात उतरते.
इथून पुढे माथ्यावरील केळद गाव गाठायला मढे घाट किंवा उपांड्या घाटाने जावे लागते. पैकी उपांड्याने वेळ थोडा कमी लागतो त्यामुळे आमच्यातील काही लोकं त्या वाटेने गेले. आम्ही मात्र ( majority लोकं) ठरल्याप्रमाणे मढे घाटाने निघालो. सिंहगडावर बलिदान दिलेल्या सरदार ' तानाजी मालुसरे ' यांचे शव मढे घाटातून ' बिरवाडी ' मार्गे त्यांच्या उमरठ ह्या गावी नेले म्हणून ह्या घाटाचे नाव मढे घाट पडले अशी वंदता आहे.
ह्याही घाटात आंब्यांची खूप झाडे होती. आमचा वाटाड्या त्याचे पोते
भरतच होता. ते भरलेलं पोत घेऊन घाट चढणे त्याला नक्कीच कठीण होत होतं. त्यामुळे तो
आमच्या मागे पडत होता. करवंदाच्या जाळ्या पण जागो जागी होत्या. त्याचाही आस्वाद अधून
मधून घेत आमची चढाई चालू होती. ह्या घाटात दोन्ही बाजूने भरपूर झाडोरा होता त्यामुळे
उन्हाचा त्रास अजिबात जाणवत नव्हता. पण हवा नसल्यामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या.
घाम पुसायला रुमाल अपुरा पडत होता. थोड्या थोड्या वेळाने थांबत, पाणी पीत नव्या हुरूपाने
नागमोडी चढाई चालू होती. काही काही ठिकाणी दगडांचा वापर करून पायऱ्या बांधलेल्या दिसत
होत्या. त्यावरून घाटाची प्राचीनता लक्षात येत होती. पावसाळ्यात आपल्या घनघोर आवाजाने
आसमंत दणाणून सोडणारा " लक्ष्मी धबधबा " आता कोरडाठाक पडला होता. घाटाच्या
शेवटी डोंगर थोडासा ढासळलेला होता. त्यातून मार्ग काढत मढे घाटाच्या पठारावर पोचलो
तेव्हा १० वाजले होते.





















No comments:
Post a Comment