वरसुबाई पठार ट्रेक २४.०७.२०२२
एक पावसाळी भटकंती
ह्यावर्षीच्या चिंब पावसातली पहिलीच भटकंती. नाही म्हणायला जून महिन्यात भुरभुर पावसात निरानदी ट्रेल केला होता. जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस झालाच नव्हता. जुलैमध्ये मात्र पावसाने असा काही सगळा बॅकलॉग भरून काढला की नद्या, ओढे, धबधबे अगदी ओसंडून वाहू लागले. बऱ्याच ठिकाणी पर्यटन आणि ट्रेकिंगवर काही काळापुरते निर्बंध लागले. असो.
वरसुबाईचे ठाणे पुणे जिल्ह्यात खेड आणि मावळ तालुक्यात असलेल्या
भिमाशंकर डोंगररांगात वसलेले आहे. खेड तालुक्यातील तोरणे बुद्रुक हे पायथ्याचे छोटेसे
गाव. पुण्याहून सकाळी ४.४५ ला युनिव्हर्सिटी
चौकातून निघून चाकणमार्गे जात तोरणे बुद्रुक गावात पोचलो तेव्हा सकाळचे ७.३० झाले होते. कमी अधीक प्रमाणात
पाऊस चालूच होता. भोवतालचे डोंगरमाथे दाट धुक्याने वेढलेले होते. पावसाळी वस्त्रे लेऊन,
भात खाचरांच्या बांधावरून ट्रेकला सुरुवात केली. खळखळणारे अनेक छोटे मोठे धबधबे, ओहोळ
पार करत, कधी जंगलातून तर कधी मोकळंवनातून आमची डोंगर चढाई चालू होती. कातळ टप्पे पार
करताना मात्र योग्य काळजी घ्यावी लागत होती. वातावरण अतिशय धुंदफुंद होते. खाली पोपटी
भात शेतांनी वेढलेले छोटेसे तोरणे गाव अतिशय मोहक दिसत होते.
१.३/२ तासांच्या चढाईनंतर, वर पठारावर पोचल्याबरोबर समोर वरसुबाईचे छोटेसे मंदिर दिसले. आदिवासी लोक भक्तीभावाने देवीची पूजा करतात. देवीचे दर्शन घेऊन, पोटपूजा करत आजुबाजूचा परिसर न्याहाळत होतो. धुक्याने वेढलेले, नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले खडकाळ पठार होते. धुवाधार पाऊस आणि प्रचंड वेगवान वारा ह्याचा अनुभव घेताना मजा येत होती. इथे खूप साऱ्या पावनचक्या (Wind Mills) उभारण्यात आल्यात. धुक्यामुळे त्या दिसत नव्हत्या पण त्यांच्या अजस्त्र पात्यांमुळे वेगवान वारा कापताना जो आवाज येत होता त्यामुळे त्यांचे अस्तित्व जागोजागी जाणवत होते. आम्हाला फक्त त्यांचा घेरेदार बुंधा दिसत होता. कधी कधी तर काहीच दिसत नव्हते खालून जाताना फक्त तिच्या पंखांचा भीतीदायक आवाज ऐकू येत होता.


























No comments:
Post a Comment