खडसांबळे लेणी - डेऱ्या घाटवाट
ट्रेक २०.०२.२२
मागच्या शनिवार रविवारच्या, दोन दिवसांच्या किल्ले रायगड लिंगाणा भागातला निसणीची वाट - बोचेघोळ वाट ह्या ट्रेकला (बुक करून सुध्धा) जाऊ शकलो नाही आणि शेवटचा ट्रेक करूनही दिड महिना झाला होता, त्यामुळे कधी एकदा ट्रेकला जातो असे झाले होते. त्यामुळे STF ने २० फेब्रुवारीचे ह्या ट्रेकचे schedule टाकल्या बरोबर ठरवले की जायचेच म्हणून.
शनिवारी बॅकपॅक चढवून औरंगाबाद- पुणे आणि रविवारी पहाटे 4.45 वाजता
चांदणी चौक येथून आमची STF ची बस पकडली. पुढे मुळशी, ताम्हिणी घाटातून 8.30 च्या सुमारास
खडसांबळे ता. सुधागड येथे पोचलो. आमचा गाईड येईपर्यंत भाऊंनी ट्रेकची माहिती दिली.
ऊन आणि भरपूर चढाई असल्यामुळे जवळील पाण्याचे व्यवस्थित नियोजन करावे लागणार होते. येथे ट्रेक करत यायचे असल्यास मुळशी तालुक्यातील
एकोले गावातून घनगडच्या बाजूने पुढे केवणीचे पठार गाठायचे आणि घोणदांड उतरून खडसांबळे
लेण्यांना येत येते.
गाईड आल्यावर ९ वाजता ट्रेकला सुरुवात झाली. गावातून अगदी समोरच तैलबैला दिसत होता. तैलबैलाच्या कातळ भिंतींवर रॉक क्लाइंबिंग आणि रॅपलिंग करूनच जाता येते. आताही एक ग्रुप क्लाइंबिंग करत असल्याचे कॅमेऱ्याच्या झूमलेन्स मधून दिसत होते. पाऊण एक तासांच्या निष्पर्ण जंगलातून आणि शेवटी काही भाग दाट जंगलातून गेल्यावर आम्ही लेण्यांमध्ये पोचलो. ह्या Budhhist Caves 2nd Century BC च्या आहेत. मुख्य लेणीत budhhist monk साठी अनेक विहार (सेल्स) बांधले आहेत आणि प्रार्थनेसाठी मोठा स्तूप देखील आहे. येथून समोर दिसणारा नजारा देखील अप्रतिम होता. इथे ब्रेकफास्ट आटपून भरपूर फोटोग्राफी केली.
दाट जंगल पार करत आम्ही आता मोकळ्या पठारावर आलो. समोर मोठी डोंगर रांग दिसत होती. तिथेच कुठेतरी डेऱ्या घाटवाट दडली होती. मधे दरी होती. चालत चालत दरीजवळ वाटाडेसाहेब थांबले. आम्हाला थांबायला सांगून साहेब वाट शोधायला गेले. आम्ही उन्हात वेगवेगळ्या झाडांखाली थांबून, समोरची डोंगररांग न्याहाळत थोडं चाऊम्याऊ खाल्ले. १५-२० मिनिटे झाली तरी वाटाड्याचा पत्ताच नव्हता. आम्ही बरेच आवाज दिले पण त्याचा काहीच रिस्पॉन्स येईना. आम्हाला तिथे थांबायला सांगून पठ्या जंगलातून पलीकडून पळून गेला.
आम्ही जंगलात घुसून वाट शोधायचा प्रयत्न केला पण वाट सापडत नव्हती. वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. भाऊंनी सगळ्यांकडे पाणी किती आहे ह्याचा अंदाज घेतला. कारण ऊन खूप होते आणि वेळेत वाट सापडली नाही आणि पाणी संपले तर मोठी बिकट परिस्थिती येईल. म्हणून दुसरा पर्याय आम्ही निवडला की परत मागे फिरून नागशेत (ता.सुधागड) गाठायचे, तिथून गाढवलोट घाटाने चढून हिर्डी (ता.मुळशी) आणि पुढे अंधारबनच्या जंगलातून पिंपरी गाव आणि मग आमच्या बसने पुणे गाठायचे. पण मागे फिरून पठारावरून थोडेफार चालल्यावर खाली वस्ती दिसली. १०-१२ झोपड्या दिसत होत्या. एकदम हायसे वाटले. इथे पाणी आणि वाटाड्या नक्की मिळणार म्हणून उत्साहात झपाझप पाय उचलत त्या वाडीत पोचलो. ती नागशेतची धनगरवाडी होती.
बाप्यें मंडळी कोणीच दिसत नव्हती. एक आज्जीबाई आणि तिची सूनबाई एका झोपडीत भेटल्या. जवळच पाणी पण होते. त्यांना डेऱ्या घाटावाटेबद्दल विचारले. आजीबाईंनी समोर डोंगररांगेत खुणेनी दाखवली. पण वाट दाखवायला यायची त्यांची तयारी नव्हती. तिथेच मग डबे उघडायचे ठरले. जेवण करून, पोटात आणि बाटल्यांमध्ये पाणी भरून निघायचे ठरले कारण मधे कुठेही पाणी मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे आजीबाईच्या पडवीत आम्ही डबे संपवले. त्यांच्या नातवांना आमच्याकडचा खाऊ दिला. त्यांनीही पाण्याचा हंडा आणून ठेवला. जेऊन, पाणी भरून निघेपर्यंत त्या वाडीतले एक मामा तयार झाले वाट दाखवायला. मग काय लगेच निघालो.
एक वाजला होता. जबरदस्त कचकचीत चांदणे पडले होते. जागोजागी पळस फुलला
होता. सुरवातीला मोठे पठार होते. ते संपल्यावर वाट चढायला लागली. मधे मधे थोडीफार झाडी
होती. चढ चांगलाच तीव्र होत चालला होता. त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी उंची गाठू लागलो
होतो. कोकणातून वर येत असल्यामुळे, मधून मधून थंडगार वाऱ्याची झुळूक उत्साह टिकवून
ठेवत होती. ह्या डोंगरावर एक डेऱ्यासारखा दिसणारा आकार आहे त्यामुळे ह्या वाटेला डेऱ्याघाट
म्हणत असावेत. मधे भरपूर उंचावर आल्यावर गर्द झाडीत १० मिनिटे विश्राम केला. पाणी/electral/tang
पिऊन ताजेतवाने होऊन परत चढायला सुरुवात केली.
बसमध्ये आणि रात्री झोपेत डेऱ्या घाटातील टप्पे काही केल्या डोळ्या
समोरून हलत नव्हते. हा घाट फारसा वापरात नाही. गावकरी पण ह्याचा फारसा वापर करत नसावेत.
जनावरांनाही इकडे चरायला आणत नसावेत कारण तश्या काही खणाखुणा बघायला मिळत नाहीत. वाटेत पाणी कुठेही नाही. हा ट्रेक करताना
एकट्या दुकट्याने न करता ग्रुप बरोबरच केलेला सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगले. असो,
अजुन एका छान घाटवाटेची भर माझ्या ट्रेक लिस्ट मध्ये पडली ह्याचा खूप आनंद.
विवेक
फाटक
































