Friday, May 15, 2020

भैरवगड (शेरपुंजे) ते रतनगड ट्रेक २८-२९ डिसेंबर २०१९ (B2R Trek)

मागचा ७५ किमीचा  लोणावळा-भीमाशंकर  रेंज ट्रेक करून तीन महिने झाले. त्यामुळे परत एक रेंज ट्रेक करण्याची इच्छा होती.  रेंज ट्रेक ची मजा काही औरच असते. एक तर अशा ट्रेक ला येणाऱ्यांची संख्या कमी असते त्यामुळे एकमेकांची ओळख पटकन होते आणि ती टिकून राहते. तर ह्या वेळचा ट्रेक होता अकोले तालुक्यातला भैरवगड (शिरपुंजे) ते रतनगड असा जवळपास ५५ किमी चा. ह्या ट्रेक चा मार्ग होता, शिरपुंजे गाव- भैरवगड-घनचक्कर टॉप-गवलदेव टॉप-मुडा टॉप-कुमशेत गाव-कात्राबाई टॉप- रतनगड.  ट्रेक साठी एकूण १२ शिलेदार जमले२७ डिसेंबर ला रात्री साधारण १२ वाजता  शिवाजीनगर पुणे येथून खाजगी बस ने प्रस्थान केले. पुण्याहून निघून राजगुरूनगर, आळेफाटा , राजूर असे करत सकाळी /.30 वाजता आम्ही शिरपुंजे ह्या गावात पोचलो तेव्हा  गाव अजून जागे व्हायचे होते

                                                 

एका मंदिरात आम्ही बस्तान बसवले. सकाळच्या न्याहारी साठी नुड्ड्ल्सचा बेत होता. त्यासाठी लागणारी गाजरे ,मटार वगैरे आम्ही विशालला (आमचा ट्रेक लीडर) कापून/सोलून दिली. त्याने मस्त गरम गरम नुड्ड्ल्स बनवली आणि वर  mast गुळाचा चहा बनवला. मस्त बेत जमला. आता ट्रेक ला सुरवात करायची होती. पण हा पायलट ट्रेक असल्यामुळे आणि ट्रेक चा मार्ग आम्हालाच शोधायचा असल्यामुळे गावातल्याच सुरेश भाऊला बरोबर घेतले. तो आम्हाला मुडा टॉप पर्यंत मार्ग दाखवणार होता आणि कुमशेत गावात उतरण्याची वाट दाखवून परत फिरणार होता

साधारण वाजता आम्ही भैरवगड (११४५ मीटर्स) चढायला सुरवात केली. वाट मस्त चढीची पण अधून मधून अर्धवट पायऱ्यांची होती. तासाभरात आम्ही एका खिंडीत पोचलो. तेथून वर चढायला व्यवस्थित पायऱ्या होत्या. वरचा परिसर बऱ्यापैकी मोठा आहे. भैरोबाचं मंदिर आहे. घोड्यावर स्वार असलेली भैरोबांची  मूर्ती आहे. गडावर पाण्याची - टाकी आहेत. गडावरून दिसणाऱ्या भोवतालच्या परिसराचा आस्वाद घेऊन, भैरोबांचे दर्शन घेऊन १०/१०.30 ला आम्ही गड उतरायला सुरवात केली




आता लक्ष होते घनचक्करचे. घनचक्कर हे महाराष्ट्रातील सह्याद्री रांगेतले दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर (१५३२ मीटर्स) आहे. भैरवगड वरून उतरताना लगेचच डावीकडे एक अगदी निमुळती  वाट जाते. एका  मोठ्या लांबलचक ट्रॅव्हर्स वरून मार्गक्रमण करत आपण एका मोठ्या पठारावर येतो. येथून आपल्याला घनचक्कर चे प्रथम दर्शन होते. ह्या पठारावर आम्ही एक छोटा खादाडी ब्रेक घेतला. यथेच्छ फोटो काढले आणि पुढे मार्गस्थ झालो. साधारण वाजता आम्ही घनचक्कर टॉप वर पोचलो. वरून दिसणारा सह्याद्रीचा नजारा अप्रतिम होता त्यामुळे इथेही मस्त फोटो सेशन झाले.  वर पाण्याची किंवा थांबण्याची काहीही सोय नाही त्यामुळे ट्रेकर्स कडून हा भाग दुर्लक्षित आहे.

 




ता आमचे पुढचे लक्ष होते गवलदेव टॉप(१५२२ मीटर्स). घनचक्कर वरून उतरताना आम्ही एका मोठ्या पठारावर आलो. गुरांचे खूप कळप इथे चरत होते. पुढे जाऊन पहिले तर खाली खोल दरी. उतरायला जागाच नाही. आमचा सुरेश भाऊ पण गोंधळला. दरीच्या पुढे विशाल गवलदेव पर्वत दिसत होता पण वाट सापडत नव्हती. थोडे डावीकडे चालत असताना घनचक्कर आणि गवलदेव मध्ये एक खिंड लपलेली  दिसली. अजून थोडे पुढे गेलो आणि खाली उतरणारी, वाळलेल्या झुडपांमधून जाणारी  वाट दिसली. त्या वाटेने, जवळपास अर्धा तास वेडीवाकडी वळणे घेत आम्हाला खिंडीत आणून सोडले.

 


व्हाना .३०/2 वाजले होते. पोटात आता कावळ्यांनी ओरडायला सुरवात केली होती. आम्हाला वर चढणारी वाट दिसत होती, पण कुठे मस्त सावली दिसत नव्हती जेवायला. शेवटी पुढे गेल्यावर दोन मोठ्या खडकां मध्ये सावलीची जागा मिळाली. मग काय ! सगळ्यांनी आपापले डबे उघडले आणि मस्त अंगतपंगत केली. जेऊन थोडी विश्रांती घेऊन पुन्हा सुरवात केली. पुन्हा मोठा ट्रॅव्हर्स घेत, वाट दाट झाडीतून गवलदेव डोंगराच्या पुढच्या बाजूला आली. आता ऊन चांगलेच तापले होते.दुपारचे साधारण वाजले होते. सावली साठी एखादे झाडही नव्हते. आम्ही तसेच उन्हात वर चढत होतो. एक मोठा रॉक patch लागला. तोही पार केला तरीहि अजून टॉप दिसत नव्हता पण अजून चढच दिसत होता. शेवटी एकदाचे वाजता वर पोचलो. इथेही वर काहीही नाही. फक्त एका  छोट्याशा चौथऱ्यावर गवलदेवाची स्थापना केलेली दिसत होती. इथे दर्शन घेऊन, थोडी फोटोग्राफी करून आम्ही लगेच उतरायला सुरवात केली कारण इथून आमचा वाटाड्या परत फिरणार होता आणि आम्हाला कुमशेतचा लांबचा पल्ला गाठायचा होता। काही लोक वर गुरं चारत होती त्यांनी सांगितले कि तीन साडेतीन तास लागतील खाली कुमशेतला उतरायला. उतारायचेच असल्यामुळे खूप हायसे वाटले. पण तासात सूर्य मावळणार होता आणि आम्हाला अंधारात डोंगरवाटा उतरायच्या होत्या. त्यामुळे लगेच उतरायला सुरवात केली.

 




पाच साडे पाच पर्यंत सूर्य मावळतीला लागला आणि वातावरणात सुखद गारवा यायला लागला. आजूबाजूची सहयाद्रीची शिखरे सुद्धा मावळतीच्या उन्हात चमकत होती. आजोबा, कात्राबाईचा डोंगर आणि रतनगड मधूनच डोकावत होते. खाली अथांग पसरलेले भंडारदराचे पाणी दिसत होते. अंधार पडल्यावर सगळ्यांनी विजेर्या काढल्या आणि त्याप्रकाशात आम्ही कात्राबाईची डोंगरवाट उतरायला सुरुवात केली.   संपूर्ण उतरण असल्यामुळे तास सव्वा तासात आम्ही कुमशेत मध्ये दाखल झालो. विठ्ठल रखुमाई चे छोटेसे मंदिर होते आणि समोर प्रशस्त आवार होते. तिथे आम्ही भराभर तंबू उभारले. जवळच्या नदी वरून पाणी आणले. रात्री मस्त पुलाव आणि अननसाचा शिरा बनवला विशालने. आम्ही त्याला थोडी थोडी मदत केली. काही मंडळींनी तोवर शेकोटी पेटवली. मस्त जेऊन,रात्री ११/११.30 पर्यंत शेकोटी जवळ गप्पा मारत बसलो. गाव तर /.30 लाच चिडीचूप झालं होतं. ११/११.30 ला तंबूत slipping बॅग्स मध्ये झोपलो त्यामुळे थंडी अजिबात वाजत नव्हती



सकाळी ५।३० उठून रेडी झालो. आज मस्त उपमा बनवला होता विशालने आणि चहा तर काय फक्कडच बनवला होता. तंबू पॅकिंग करून झाले, गावातल्या छोट्या मुलांबरोबर फोटो सेशन झाले. .30 ला निघालो. आजही -9 तासांचा पल्ला गाठायचा होता. सर्व प्रथम काल उतरलेली कात्राबाईच्या घाटवाट चढायची होती. सकाळची ताजी हवा आणि रात्री झालेली झोप, यामुळे ताजेतवाने वाटत होते. त्यामुळे ती वाट आम्ही तासात चढून गेलो आणि कात्राबाईच्या मंदिराजवळ पोचलो. बॅकपॅक  तिथेच ठेऊन कात्राबाई टॉपसाठी निघालो. वर थोडेसे चढल्यावर लांबच लांब गवताली पठार होते. दूरवर कोणाचाही मागमूस नव्हता आणि  वाऱ्याचा सोडून कसलाही आवाज नव्हता. फक्त निशब्द शांतता. थोडेसे ढगाळ वातावरण आणि थंड गार हवात्यामुळे घामाचा त्रास जाणवत नव्हता. कात्राबाई खिंडी मधला नजारा तर औरच होता. खिंडीच्या त्या बाजूला रतनगड उभा होता. काही कसलेले ट्रेकर्स हि खिंड उतरून रतनगड सर करतातत्या खिंडीच्या टोकावर बसून बराच वेळ निसर्ग निर्मित रौद्र कड्याचे निरीक्षण करत त्याचा आनंद घेत बसलो






दुपारी एक  वाजता उतरायला सुरवात केली, कात्राबाई देवळाजवळ ठेवलेल्या sacks  घेतल्या आणि रतनगडाची वाट धरली. ईथुन पुढे संपूर्ण जंगल ट्रेक होता. कुठे विरळ तर कुठे दाट झाडीचा. साधारण .30 ला रतनगड-हरिश्चंद्रगड जंकशनला पोचलो. आम्ही चौघे मी, विशाल, वैभव आणि अनुपजी तिथेच थांबलो आणि थोडी पोटपूजा केली बाकीचे लोक रतन गडावरून येईपर्यंत. तिथून पुढे अर्ध्या पाऊण तासाची वाट होती रतनवाडी पर्यंत जिथे आमची बस थांबली होती. भराभर पाय उचलत सहा वाजेपर्यंत आम्ही रतनवाडी गाठली, फ्रेश झालो आणि अमृतेश्वराचे दर्शन घेतले. एवढा मोठा रेंज ट्रेक पूर्ण केल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होतात्या आनंदातच सात वाजता पुण्याकडे मार्गस्थ झालो. वाटेत रात्री दहा वाजता पैकी जेवण करून रात्री वाजता पुण्यात पोचलो.








Wednesday, May 13, 2020

LONAVALA TO BHIMASHANKAR TREK

साधारण जुलै महिन्यात मला विजय गव्हाणे चां मेसेज आला की लोणावळा ते भीमाशंकर ट्रेकला तुम्ही यायला उत्सुक आहात का. ट्रेक सप्टेंबर महिन्यात जाणार होता आणि स्वच्छंदी ट्रेकर्स ने हा ट्रेक आयोजित केला होता. माझा अजुन एक मित्र वैभव हा सुध्दा जायला तयार होता. मी ह्या ट्रेक बद्दल गूगल वर वाचले होते. हा साधारण 75 किमी चा जंगल ट्रेक आहे आणि तो पूर्ण करायला दोन दिवस लागतात. ह्याचे व्हिडिओज खूप सुंदर होते त्या मुळे माझी जबरदस्त इच्छा होती हा ट्रेक करायची. ह्या पूर्वी मी एकही रेंज केलेला नव्हता आणि ह्या ट्रेकर्स ग्रुप बरोबरचा पहिलाच ट्रेक असणार होता.

जुलै ते ऑगस्ट 19 ह्या दोन महिन्यात मी - ट्रेक केले जसे की गोप्या घाट ते शिवथरघळ, भोरगिरी ते भीमाशंकर, लिंग्या घाट ते कुर्डू गड, तिकोना वगैरे. पण मी अधिरतेने वाट पाहत होतो तो ह्या लोभी ट्रेक ची जो जाणार होता 21-22 सप्टेंबर 19 ला. ह्या वर्षी पावसाळा खूपच लांबला होता आणि पाऊसही खूप झाला होता. अशा लांबच्या ट्रेक ला इतर पावसाळी ट्रेक सारखी गर्दी नसते. कारण एकतर खूप लांबचा पल्ला गाठायचा असतो आणि त्यासाठी भरपूर शारीरिक क्षमतेचा लागते. आमचा ट्रेक लीडर विशाल धरून 12 लोक जमले.

मी 20 सप्टेंबर ला औरंगाबादहून निघून बाणेर ला घरी जाऊन रात्री 9.30 पर्यंत शिवाजीनगर स्टेशनवर पोचलो. 10 पर्यंत एक एक करून सगळे शिलेदार जमा झाले. सगळ्यांच्या एकमेकांशी ओळख झाल्या. 10.15 ला लोणावळा लोकल पकडुन 11.30 पर्यंत लोणावळ्याला पोचलो. सगळे लोक पहिल्यांदाच भेटत होते. पण ट्रेकिंग ची मनापासून आवड असल्यामुळे गाडीत खूप गप्पा झाल्या जणू की खूप दिवसांची ओळख आहे. रात्रीचे जेवण/खाणे ट्रेक ला जायचे म्हणून लवकर झाल्यामुळे, सगळ्यांनाच थोडी भूक लागली होती. एका उडप्याच्या हॉटेल मध्ये अर्धवट लावलेल्या शटर खालून सगळे आत घुसलो. कारण 12 वाजत आले होते आणि बाहेर पोलीस ची गाडी फिरत होती. मस्त गरमा गरम डोसा उत्तप्पा वर ताव मारून रात्री साधारण 12.30 ला आमची वळवंड गावाकडे मस्त गप्पा मारत पायपीट सुरू झाली. वाटेत लहान लहान वाड्या वस्ती वर कुत्री मोठमाठ्याने भुंकुन आमचे स्वागत करत होती. विशाल आम्हाला ट्रेक चे अनुभव सांगत होता. मधेच त्याने कातळधार धबधब्याकडे (उल्हास व्हॅली)जाणारा रस्ता दाखवला. अधूनमधून आकाशात चंद्रदर्शन होत होते, रातकिड्यांची किरकिर चालू होती, पाऊस पडून गेलेला होता, आजूबाजूचे धबधबे दिसत नव्हते पण खळाळत्या पाण्याचा आवाज निरव शांतता भेदत होता. तुंगारली dam ला वळसा घालून, फनसराई गाव पार करत राजमाची रस्ता सोडून आम्ही वळवंद गावाच्या रस्त्याला लागलो. रात्रीच्या अंधारात चिनिम ची फुले चमकत होती. काहींनी फोटो काढायचा प्रयत्न केला. मजल दर मजल करत रात्री 3.30 वालवंड गावात पोचलो. तिथे आधीच एक ग्रुप आला होता

आम्ही एका मंदिराच्या व्हरांड्यात पथारी पसरली. काही जण व्हारांड्याच्या खालच्या अंगणात झोपले. थोड्या वेळात पावसाची मोठी सर आली. खाली झोपलेल्या ची एकच तारांबळ उडाली. बाजूला एक छोटेसे देऊळ होते. त्यात ते दाटीवाटीने झोपले. साडेचार पाचला अजुन एक मुंबईचा ग्रुप आला. तेही जिथे जागा मिळेल तिथे झोपले. मी फारतर अर्धा तास झोपलो असेन. 6 वाजता उठलो. रात्रीच्या अंधारात आजूबाजूचे सृष्टी साैंदर्य दिसले नव्हते. आता उजाडताच हिरवाईने नटलेले समोरचे डोंगर, सभोवार पसरलेले मखमली कुरण बघून स्तिमित झालो. मग थोडेसे गावात फिरून, मस्त कांदा पोहे खाऊन आणि चहा पिऊन पुढे मार्गस्थ झालो.


आज वलवंड ते पडरवाडी पर्यंत चा प्रवास. साधारण 35-37 किमी चा पल्ला गाठायचा होता. गावातून निघाल्या बरोबर एका लहानशा कॅनॉल cha निमुळत्या वळणदार भिंतीवरून चालत निघालो. पुढे एक चढण चढून घनदाट जंगलातून ढाक बहिरी किल्याकडे निघालो. इथे विशाल ने सांगितले की हे जंगल लवकरात लवकर पार करूया कारण इथे अस्वल असण्याची शक्यता असते. मग काय आम्ही वेगात एकमेकांशी काही बोलता ते जंगल पर केले आणि मोकळ्या पठारावर आल्यावर एकदम हायसे वाटले. बाहेर आल्यावर निळ्याशार आकाशाच्या आणि हिरव्यागार डोंगरांच्या बॅक ग्राउंड वर समोर ढाक बहिरी दिसत होता, लांबवर राजमाची, ड्युक नोज, मांजर सुंभ्याचा डोंगर आणि आजूबाजूला असंख्य पिवळी सोनकी फुले डुलत होती. मधूनच काही जांभळी फुले आणि त्यावर उडणारी फुलपाखरे. हवा अतिशय स्वच्छ आणि सुखद. आम्ही आमच्याही पेक्षा उंच कारवी जंगलातून डोंगराच्या अगदी कडेकडेच्या पाऊलवाटेने निघालो. पुढे वाटेवर बिबट्याच्या अगदी ताज्या पाऊल खुणा दिसल्या. आम्ही त्यांचे निरीक्षण करून फोटो काढले. बहुतेक अगदी काही वेळा पूर्वी तो तिथून गेला असावा. पुढे एका ओढ्या जवळ थोडा पाणी आणि खादाडी ब्रेक घेतला. खूप फोटो काढले आणि जवळपास अर्ध्या तासाच्या ब्रेक नंतर पुढे निघालो.





पुढे
ढाक किल्याच्या आधी वाट दरीत उतरून पुढच्या डोंगरावर चढत होती, पण आम्हाला दरीत उतरणारी वाट दिसत नव्हती. तिथे वाट शोधण्यात थोडा वेळ गेला. तिथेही आम्ही खूप फोटो काढले. प्रत्यकाचे फेसबुक डीपी साठी फोटो काढून झाल्यावर खाली उतरायला सुर्वात केली. उतरणारी वाट खूप निमुळती आणि खूप खाच खळग्यांची होती. दोन्ही बाजूला कारवी आणि जांभळ्या फुलांची काटेरी झुडपे होती. काटेकोरांटीला कशी बोंडे असतात आणि त्यात केशरी फुले येतात तशी काटेरी बोंडे असलेली झुडपे खूप होती. उतरताना हातापायाला खूप काटे टोचत होते. शेवटी एकदाचे पठारावर आलो. आता पुढचा डोंगर चढून ढाकच्या जंगलात शिरलो. ढाक किल्याला या पूर्वी आलो होतो जांभीवली कडून ह्याच जंगलातून. पुढे एका ठिकाणी झाडावर "भीमाशंकर कडे" अशी पाटी टांगली आहे असे माहित होते. त्यामुळे त्या पाटी कडे लक्ष होते. पुढे जंगलातून जाताना ती पाटी दिसली आणि आम्ही त्याप्रमाणे उजवीकडे वळलो. आता परत छोटा डोंगर चढून कुसुर पठाराकडे जायचे होते. चढ चांगलाच दमवणारा होता त्यामुळे वर चढल्यावर थोडे थांबलो पाणी प्यायले आणि पुढे निघालो. वर एक गुराखी मामा भेटले. त्याचाशी गप्पा मारताना त्यांना विचारले ह्या जंगलात अस्वल, बिबटे आहेत का. तर ते म्हणाले अस्वल नाही पण बिबटे आहेत. पण बिबट्या फार लाजाळू असतो आणि माणसांपासून दूरच राहतो. गाई म्हशींच्या पिल्लांना किंवा छोट्या प्राण्यांना तो लक्ष करो


आता 4-5 किमी चे लांबलचक कुसूर् पठार पार करायचे होते. ह्या पठाराचा आडवा पसारा 17-18 किमीचा आहे. आम्हाला उभे अंतर जे की 4-5 किमी आहे ते पार करायचे होते. ह्या पठारावर पावसानंतर असंख्य जांभळा तेरडा फुलतो. नजर जाईल तिथपर्यंत असंख्य जांभळी फुले वाऱ्यावर डुलत होती. पठारभर एकच रंग, जांभळा. पठारावरील मार्गक्रमण संपता संपेना. किती तरी वेळ चालतच होतो तरी पठार संपायचे नावच घेईना. शेवटी एक जंगल लागले. खाली जमिनीवर खूप पाला पाचोळा, काटक्या होत्या. त्यावरच सर्वांनी पाठ टेकली. थोडे चाऊ म्याऊ खाल्ले. तिथे जंगलात वाटेच्या कडेला दोन झाडांमध्ये झाडाच्याच मुळाचा झोका तयार झाला होता. त्यावर आम्ही सगळ्यांनी झोका खेळला. झोका जास्त जोरात घेता येत नव्हता कारण मागे खूप उतार होता


जंगलातून बाहेर आल्यावर आमचा मार्ग थोडा चुकला. Kusur पठारावर शेवटी एक मनोरा आहे. त्याला उजव्या बाजूस ठेऊन आम्हाला पुढे जायचे होते. पण आमचे थोड्या वेळाने तिकडे लक्ष गेल्यावर पाहिले तर तो डाव्या बाजूस होता. तिकडे झाडांवर आधीच्या ट्रेकर्सनी खुणे करिता रिबिनी बांधलेल्या होत्या. त्यापण दिसेनात. थोडी शोधा शोध केल्यावर आम्हाला योग्य ती वाट सापडली आणि आम्ही त्या मनोर्या जवळच्या धनगर वाडीत पोचलो. एका गर्द सावलीच्या झाडाखाली पडी घेतली. तो पर्यंत तिथल्या मामांनी थंडगार पाण्याची घागर आणून ठेवली. त्या थंडगार पाण्याने आम्ही तहान भागवली तो पर्यंत त्यांनी मस्त ताक करून आणले. हे तर सोने पे सुहागा. प्रत्येकाने एक दोन ग्लास ताक प्यायले. पाण्याच्या बाटल्या थंड पाण्याने भरून घेतल्या, मामांना योग्य तो मोबदला देऊन कसूर पठारा वरून खाली कुसर गावात उतरायला सुरुवात केली. एव्हाना दुपारचे दोन वाजले होते. वाळवंड हून निघून 6.30/7 तास झाले होते. एव्हाना आम्ही खाली कूसुर गावात असायला पाहिजे होतो. तिथे एका मावशी कडे जेवण सांगितले होते. उशीर झाला होता. विशालने त्यांना फोन करून 1/1.30 तासात पोचतो असा निरोप दिला. आम्ही 4 पर्यंत डोंगर उतरून त्यांच्या कडे गेलो. फ्रेश होऊन मस्त पिठलं भाकरी चे जेवण केले. अर्धा तास आराम केला. इथून पुढे तळपेवाडी पर्यंत 13 किमी चा डांबरी रस्ता होता. त्यामुळे विशालने एक जीप सांगितली होती. आमच्या पैकी दोघे जण येथूनच पुण्याला परत गेले. आता आम्ही 10 लोक उरलो. तळपेवाडी पर्यंत जीप मध्ये मस्त डुलकी लागली. साधारण 5.30 वाजता तळपेवाडीत पोचलो. तिथे मस्त ब्लॅक tea घेतला. आम्हाला रात्री मुक्कामाला पदरवाडीला जायचे होते. तळपेवाडीहून वांद्रेखिंड मार्गे हे अंतर साधारण 2/2.30 तासांचे होते.


वाजता तळपेवाडी हून वांद्रे खिंडीकडे निघालो. शेतात काम करणारी लोकं आम्हाला वांद्रे खिंडीकडे जाणारी वाट हातवारे करून दाखवत होते. वाटेत एक खूप मोठा धबधबा लागला. तिथे थोडासा वेळ घालवला. एव्हाना अंधार पडायला लागला होता. अजुन आम्ही खिंडी पासून बरेच दूर होतो. जोरात पावसाला सुरुवात झाली. आम्ही ताबडतोब रेन जॅकेट चढवली. रस्ता दाट जंगलातून जात होता. अंधार पण पडला होता. आम्ही आमच्या विजेरीच्या प्रकाशात खिंड चढत होतो. 7.30 ला आम्ही खिंडीत पोचलो. थोडा पाणी ब्रेक घेतला आणि पलीकडच्या बाजूने खिंड उतरायला सुरुवात केली. लांबवर गावचे दिवे दिसत होते. पण बराच वेळ उतरून सुध्दा ते दिवे जवळ यायच्या ऐवजी अजुन लांबच जात होते. अंधारामुळे काही कळत नव्हते. विशालने आम्ही ज्यांच्याकडे होम स्टे करणार होतो त्यांच्या मुलाला सोपानला फोन लावला. त्याला आम्ही साधारण खुणा सांगितल्या त्या प्रमाणे तो थोड्या वेळात समोरून टॉर्च घेऊन आला आम्हाला घ्यायला. त्याला बघून आमचा जीव भांड्यात पडला. पदरवाडी गाव समोरच्या दाट झाडीत लपले होते त्यामुळे ते आम्हाला दिसत नव्हते. त्या नंतर आम्ही तासभर भातखाचरातून, बांधावरून त्याला फॉलो करत घरी पोचलो तेव्हा 8.30 झाले होते.


घरी पोचल्यावर थोडे सोपान cha आई बाबांबरोबर गप्पा झाल्या. ते आमची बराच वेळ पासून वाट पाहत होते. सकाळ पासून पायपीट केलेले बूट मोजे काढले. मस्त फ्रेश होऊन कपडे बदलून पाठ टेकली. त्यांनी पडवी cha बाजूला, एक मोठी खोली होती हॉल सारखी, त्यामध्ये मोठी सतरंजी अंथरली होती. मस्त स्वयंपाक होई पर्यंत 10 वाजे पर्यंत झोप काढली तो पर्यंत जेवण तयार झाले. बाजरीची भाकरी, भाजी, भात जेवण केले. आम्ही झोपलेलो असताना विशाल आणि प्रथमेश ने चुलीवर सकाळ साठी गुलाबजाम बनवले.

सकाळी उठून लवकर आवरले. आजही जवळपास 20-22 किमी पल्ला गाठायचा होता. सकाळी मस्त पोहे आणि रात्री केलेले गुलाबजाम असा नाश्ता वर फक्कड चहा झाला. बॅकपॅक व्यवस्थित भरली. त्या कुटुंबाबरोबर फोटो सेशन केले आणि 7.30-8 ला पदरवाडी सोडले. ते काका आम्हाला थोडे लांबवर वाट दाखवायला आले आणि पुढची वाट समजाऊन परत फिरले. रात्री मस्त झोप झाल्यामुळे सगळ्यात उत्साह संचारला होता. आज अंतर कमी असल्यामुळे दुपारपर्यंत भीमाशंकर गाठू असा अंदाज होता. आजची घाटवाट ही खूप सुंदर, निसर्ग संपन्न होती. हवा ही खूप आल्हाददायक होती. सोनकी cha फुलांचे ताटवे आजही आमच्या स्वागताला होते. मध्ये एक मस्त व्ह्यू होता. आम्ही चालत असलेला हिरवागार सोनकी cha फुलांनी बहरलेला डोंगर, खाली खोल दरी आणि समोर कोथळी गड, लांबवर डोकावणारा पदर गड आणि वर निळेशार आकाश. इथे आम्ही जवळपास तासभर थांबलो. यथेच्छ फोटो काढले. गवतात लोळलो


तासाभराने भानावर आल्यावर निघालो. पुढे एक दीड तासाच्या पायपिटी नंतर जंगलातला देव खेतोबाचे छोटेसे मंदिर लागले. मंदिराच्या आजूबाजूला छोटे छोटे झरे वाहत होते. ते पाणी पिऊन बाटल्या भरून घेतल्या. इथे एका मोठ्या थोरल्या शिळेवर बसून सगळ्यांनी बरोबर आणलेला खाऊ संपवला. ह्या मंदिरात जाण्यासाठी थोडे मुख्य वाटे पासून, थोडे उजव्या बाजूस जाऊन बरच अडवतिडव वळून बऱ्यापैकी खाली कच्या वाटेने उतरावे लागते. पुन्हा वर चढून मुख्य वाटेला लागताना आम्ही रस्ता चुकलो. विशाल ने download करून आणलेल्या गूगल मॅप वरून बरीच खटपट करून पुन्हा योग्य मार्गाला लागलो. पुन्हा पुढे जंगलात शिरताना तीन पायवाटा लागल्या. आता ह्यापैकी कोणती घ्यायची? परत गूगलबाबा कामाला आला. आम्ही मार्गक्रमण करत असलेला भाग इतका निर्मनुष्य होता आणि दाट जंगलाचा होता की कोणाला विचारायची सोयही नव्हती.

जंगलातून बाहेर आल्यावर लांबवर आम्हाला काही लोक ओढ्यावर कपडे धुताना दिसले आणि हायसे वाटले. त्या ओढ्याला दोन प्रवाह येऊन मिळत होते. एका प्रवाहाचे पाणी थंड होते तर दुसऱ्याचे कोमट होते. ओढा अजिबातच खोल नव्हता. माणूस त्यात बसला तर पोटा पर्यंत पाणी येत होते. मग काय आम्ही तास दीड तास त्यात यथेच्छ डुंबलो.
नंतर तो ओढा पार करून येळवली गावात पोचलो. एव्हाना दुपारचे वाजत आले होते. ह्यानंतर cha रस्ता सरळसोट आणि सोपा होता. अर्ध्या तासात कमळजाई cha छोट्याशा देवळा जवळ आलो. दर्शन घेतले आणि निघालो. खाली भोरगिरी गाव दिसत होते. भोरगिरी ते भीमाशंकर ट्रेक मी जुलै महिन्यातच केला होता. फक्त हा आमचा रस्ता दरीच्या उजव्या बाजूला आणि तो पलीकडच्या बाजूला. थोड्यावेळाने दोन्ही रस्ते मिळाले. वाटेत भीमा नदी क्रॉस करावी लागते. तिच्या प्रवाहात खाली एका गुहेत गुप्त भीमाशंकर चे छोटेसे मंदिर आहे. बहुतेक सगळ्यांनी त्यांचे दर्शन आधी घेतलेले होते. मीही मागच्या ट्रेकला दर्शन घेतले होते. .३० वाजत आले होते. पटापट राहिलेला मार्ग आक्रमत आम्ही .३० ला भीमाशंकर ला पोचलो. ला पुण्याला जाणारी शेवटची एसटी होती ती पकडायची होती म्हणून बाहेरूनच दर्शन घेतले. जेवण केले आणि बस पकडून पुण्याकडे मार्गस्थ झालो



दोन दिवसात आमचे जवळपास ६५ किमी अंतर कापून झाले. हा ट्रेक इतका सुंदर, नयनरम्य आणि सुखावणारा होता की आम्हाला थकवा अजिबात जाणवला नाही. ट्रेकमध्ये खूप छान मित्र मंडळी मिळाली त्यामुळे ट्रेकच्या आठवणी कायम लक्षात राहतील. हा ट्रेक मला परत परत करायला नक्की आवडेल.