Wednesday, August 3, 2022

 

आंबेनळी घाटाने उतराई आणि मढे घाटाने चढाई ट्रेक २९.०५.२०२२

 

तीन वर्षापूर्वी ऐन पावसाळ्यात जुलै महिन्यात शिवथर भागातील गोप्याघाट केला होता. ह्याच भागातील घाटमाथ्या वरून कोकणात उतरणाऱ्या इतरही घाटवाटा जसे उपांड्या, मढे, आंबेनळी, शेवत्या खुणावत होत्या. त्यापैकी ह्या दोन घाटवाटा करायची संधी आमच्या ट्रेक ग्रूपमुळे मिळाली. २८ तारखेला रात्री ११.३० ला पुण्यातून निघून वेल्हा तालुक्यातील केळद गावी पोचलो तेव्हा रात्रीचे २/२.३० झाले होते. केळद हे ५००/५५० लोकवस्तीचे छोटेसे पण अतिशय टुमदार गाव. जवळच असलेल्या मढेघाट ह्या पर्यटन केंद्रामुळे, विशेषतः पावसाळ्यात वाहणाऱ्या येथील अजस्र धबधब्यानमुळे आणि तेथे चालणाऱ्या waterfall rapelling मुळे हे गाव अतिशय लोकप्रिय आहे. 

गावातील विठ्ठल रखुमाई देवळाच्या प्रशस्त आवारात अर्ध्या तासात फ्रेश होऊन, पाठ पिशवी व्यवस्थित भरून ट्रेक साठी सज्ज झालो. तो पर्यंत आमचा वाटाड्या रामभाऊ पण आला. गावातल्या समस्त श्र्वानांच्या यथेच्छ भुंकण्याच्या पार्श्वभूमीवर ट्रेकसाठीच्या सगळ्या पूर्वसूचना देऊन झाल्यावर, रात्री ३ च्या सुमारास ट्रेकची सुरुवात झाली. 

सुरवातीच्या कच्च्या रस्त्यावरून सुरुवात होऊन हळू हळू आम्ही जंगलातल्या पायवाटेला लागलो. जंगलात बऱ्याच ठिकाणी काजवा महोत्सव अनुभवायची संधी मिळाली. हातातल्या आणि डोक्यावरील विजेर्या विजवून, गच्च अंधारात हा सुंदर अनुभव घेतला. झाडावर बसलेल्या काजव्यांमुळे, संपूर्ण झाडच चमचमत होते. पण इथे जास्त वेळ न दवडता आम्ही पायवाटेने पुढे निघालो. 

पण, हाय रे दैवा!! आम्ही वाट चुकलो. अंधारात आमचा वाटाड्या गंडला. थोडासा खळग्या खळग्यांचा भाग वाटत होता, बहुतेक ओढा असावा. तिथेच ग्रुपने जागा मिळेल तिथे बसकण मारली आणि अर्धा पाऊण तास डुलकी घेतली. आमच्यातल्या दोघा तिघांनी अर्धा पाऊण तास जंगलात फिरून योग्य मार्ग शोधला. तीच होती ही अतिशय निमुळती तीव्र उताराची, मातीपासून सुटलेल्या दगडांची आंबेनळी घाटवाट. 

दोन्ही बाजूने किर्र जंगल. उतरताना छोटे छोटे दगड निसटून खाली घरंगळत होते. प्रत्येक जण आपल्या कुवतीप्रमाणे घसरत घसरत ही फारशी वापरात नसलेली वाट उतरत होते. पहाटे ४.३०/५ वाजता उतरायला सुरुवात केलेली ही वाट, साधारण ७५% उतरल्यावर आम्ही उजवीकडे traverse घेतला कर्णवडी गावाकडे जाण्यासाठी, तेव्हा सकाळचे ६ वाजले होते. पुढे वाट खाली तळ कोकणात उतरते.

 





एव्हाना उजाडायला सुरुवात झाली होती. जंगलात विविध पक्षांचे मंजुळ गुंजारव चालू होते. वाट उतरताना वारा नसल्यामुळे घामाने अक्षरशः निथळत होतो. आता थंड वाऱ्यामुळे अक्षरशः स्वर्गीय आनंद झाला. पुढे ७-८ जण गेले होते. मागचे अजुन खूपच मागे होते. आम्ही तिघे जण पुढच्या मंडळींनी मारलेल्या दिशादर्शक खडू खुणा फॉलो करत चालत होतो. वाटेत आंब्यांनी लगडलेली पुष्कळ झाडे होती. चालून चालून भूक लागलेलीच होती. मग काय, आंब्यांवर यथेच्च ताव मारला. झाडावरून आंबे तोडून खाण्यात मजा काही औरच होती. कोणाच्या मालकीची ही झाडे नव्हती. जंगलातीलच झाडे ती, अडवणार कोण. मनसोक्त आंबे खाल्ले. झाडावर चढून झाड हलवले की टपाटप आंबे/कैऱ्या पडत होत्या. आमच्या वाटाड्याने तर पोते भरून कैऱ्या घेतल्या. इथे जांभळाची पण झाडे होती. जांभळं ही खूप खाल्ली. करवंदाची जाळी तर पायवाटेच्या दोन्ही बाजूने थोड्या थोड्या अंतराने होतीच. त्याचाही फराळ चालता चालता चालूच होता. करवंदाच्या चिकाने चिकट झालेला तळहात, तिथल्याच कोणत्यातरी झाडाची पानं तोडून पुसून घ्यायचा, हा कार्यक्रम चालूच होता. घरून आणलेला डबा उघडावा लागलाच नाही. इथे जवळपास १.३०/२ तास घालवले. मागून येणारी लोकं थोड्या थोड्या वेळाने येत होती आणि आम्हाला जॉईन होत होती.




 


पुढे १५/२० मिनिटांच्या चालीवर, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर दुर्गम अशा डोंगर कपारीत, मढे घाटाच्या दरीत वसलेले कर्णवडी हे छोटेसे गाव लागले. तिथे पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. एव्हाना ८.३० झाले होते. 



इथून पुढे माथ्यावरील केळद गाव गाठायला मढे घाट किंवा उपांड्या घाटाने जावे लागते. पैकी उपांड्याने वेळ थोडा कमी लागतो त्यामुळे आमच्यातील काही लोकं त्या वाटेने गेले. आम्ही मात्र ( majority लोकं) ठरल्याप्रमाणे मढे घाटाने निघालो. सिंहगडावर बलिदान दिलेल्या सरदार ' तानाजी मालुसरे ' यांचे शव मढे घाटातून ' बिरवाडी ' मार्गे त्यांच्या उमरठ ह्या गावी नेले म्हणून ह्या घाटाचे नाव मढे घाट पडले अशी वंदता आहे. 

ह्याही घाटात आंब्यांची खूप झाडे होती. आमचा वाटाड्या त्याचे पोते भरतच होता. ते भरलेलं पोत घेऊन घाट चढणे त्याला नक्कीच कठीण होत होतं. त्यामुळे तो आमच्या मागे पडत होता. करवंदाच्या जाळ्या पण जागो जागी होत्या. त्याचाही आस्वाद अधून मधून घेत आमची चढाई चालू होती. ह्या घाटात दोन्ही बाजूने भरपूर झाडोरा होता त्यामुळे उन्हाचा त्रास अजिबात जाणवत नव्हता. पण हवा नसल्यामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या. घाम पुसायला रुमाल अपुरा पडत होता. थोड्या थोड्या वेळाने थांबत, पाणी पीत नव्या हुरूपाने नागमोडी चढाई चालू होती. काही काही ठिकाणी दगडांचा वापर करून पायऱ्या बांधलेल्या दिसत होत्या. त्यावरून घाटाची प्राचीनता लक्षात येत होती. पावसाळ्यात आपल्या घनघोर आवाजाने आसमंत दणाणून सोडणारा " लक्ष्मी धबधबा " आता कोरडाठाक पडला होता. घाटाच्या शेवटी डोंगर थोडासा ढासळलेला होता. त्यातून मार्ग काढत मढे घाटाच्या पठारावर पोचलो तेव्हा १० वाजले होते.

 





ऐन उन्हात सुध्धा पठारावर जोरदार गार वारा होता. त्यामुळे चढाईमुळे घामेजलेल्या शरीराला ताजेतवाने वाटले. घाटमाथ्या वरून दिसणारा नजारा तर लाजवाब होता. उजवीकडे गाढवकडा, समोर खाली कर्णवडीचे पठार, त्यापलीकडे सह्याद्रीची डोंगररांग. थोडावेळ एका झाडाखाली बसून सगळा आसमंत न्याहाळून घेतला, फोटो काढले आणि तेथून दोन तीन किमी असलेल्या केळद गावाकडे मार्गस्थ झालो. गावच्या ग्रामपंचायतीच्या नळावर मस्त फ्रेश झालो. आमच्या ट्रेक संस्थेने आयोजलेल्या आमरसाचे जेवण करून २.३०/३ च्या सुमारास पुण्याकडे मार्गस्थ झालो. बस मधे थोडीथोडी डुलकी घेत पुण्यात पोचलो तेव्हा ६ वाजले होते.

 







Saturday, April 2, 2022

खडसांबळे लेणी - डेऱ्या घाटवाट ट्रेक २०.०२.२२

 

खडसांबळे लेणी - डेऱ्या घाटवाट ट्रेक २०.०२.२२

मागच्या शनिवार रविवारच्या,  दोन दिवसांच्या किल्ले रायगड लिंगाणा भागातला निसणीची वाट - बोचेघोळ वाट ह्या ट्रेकला (बुक करून सुध्धा) जाऊ शकलो नाही आणि शेवटचा ट्रेक करूनही दिड महिना झाला होता, त्यामुळे कधी एकदा ट्रेकला जातो असे झाले होते. त्यामुळे STF ने २० फेब्रुवारीचे ह्या ट्रेकचे schedule टाकल्या बरोबर ठरवले की जायचेच म्हणून. 

शनिवारी बॅकपॅक चढवून औरंगाबाद- पुणे आणि रविवारी पहाटे 4.45 वाजता चांदणी चौक येथून आमची STF ची बस पकडली. पुढे मुळशी, ताम्हिणी घाटातून 8.30 च्या सुमारास खडसांबळे ता. सुधागड येथे पोचलो. आमचा गाईड येईपर्यंत भाऊंनी ट्रेकची माहिती दिली. ऊन आणि भरपूर चढाई असल्यामुळे जवळील पाण्याचे व्यवस्थित नियोजन करावे लागणार होते.  येथे ट्रेक करत यायचे असल्यास मुळशी तालुक्यातील एकोले गावातून घनगडच्या बाजूने पुढे केवणीचे पठार गाठायचे आणि घोणदांड उतरून खडसांबळे लेण्यांना येत येते.

 

गाईड आल्यावर ९ वाजता ट्रेकला सुरुवात झाली. गावातून अगदी समोरच तैलबैला दिसत होता. तैलबैलाच्या कातळ भिंतींवर रॉक क्लाइंबिंग आणि रॅपलिंग करूनच जाता येते. आताही एक ग्रुप क्लाइंबिंग करत असल्याचे कॅमेऱ्याच्या झूमलेन्स मधून दिसत होते. पाऊण एक तासांच्या निष्पर्ण जंगलातून आणि शेवटी काही भाग दाट जंगलातून गेल्यावर आम्ही लेण्यांमध्ये पोचलो. ह्या Budhhist Caves 2nd Century BC च्या आहेत. मुख्य लेणीत budhhist monk साठी अनेक विहार (सेल्स) बांधले आहेत आणि प्रार्थनेसाठी मोठा स्तूप देखील आहे. येथून समोर दिसणारा नजारा देखील अप्रतिम होता. इथे ब्रेकफास्ट आटपून भरपूर फोटोग्राफी केली.








निघताना वाटाड्याशी थोडे मतभेद झाले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे डेऱ्याघाटाने जाण्याकरता केवणी (केवणीचे पठार) वरूनच जावे लागते, दुसरीवाट नाही. भाऊंनी त्याला सांगितले की डेऱ्या घाटवाटेवर जाण्यासाठी केवणीला जाण्याची गरज नाही. तो तिथूनच परत जाईन म्हणायला लागला. शेवटी हो ना करता त्याला, आम्हाला केवणीच्या वाटेला लावायला सांगितले आणि तिथून निघालो. वाटाड्याचा काही भरवसा वाटत नव्हता. तो अगदी अनिच्छेने आला होता असे वाटत होते.



 

दाट जंगल पार करत आम्ही आता मोकळ्या पठारावर आलो. समोर मोठी डोंगर रांग दिसत होती. तिथेच कुठेतरी डेऱ्या घाटवाट दडली होती. मधे दरी होती. चालत चालत दरीजवळ वाटाडेसाहेब थांबले. आम्हाला थांबायला सांगून साहेब वाट शोधायला गेले. आम्ही उन्हात वेगवेगळ्या झाडांखाली थांबून, समोरची डोंगररांग न्याहाळत थोडं चाऊम्याऊ खाल्ले. १५-२० मिनिटे झाली तरी वाटाड्याचा पत्ताच नव्हता. आम्ही बरेच आवाज दिले पण त्याचा काहीच रिस्पॉन्स येईना. आम्हाला तिथे थांबायला सांगून पठ्या जंगलातून पलीकडून पळून गेला.


आम्ही जंगलात घुसून वाट शोधायचा प्रयत्न केला पण वाट सापडत नव्हती. वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. भाऊंनी सगळ्यांकडे पाणी किती आहे ह्याचा अंदाज घेतला. कारण ऊन खूप होते आणि वेळेत वाट सापडली नाही आणि पाणी संपले तर मोठी बिकट परिस्थिती येईल. म्हणून दुसरा पर्याय आम्ही निवडला की परत मागे फिरून नागशेत (ता.सुधागड) गाठायचे, तिथून गाढवलोट घाटाने चढून हिर्डी (ता.मुळशी) आणि पुढे अंधारबनच्या जंगलातून पिंपरी गाव आणि मग आमच्या बसने पुणे गाठायचे. पण मागे फिरून पठारावरून थोडेफार चालल्यावर खाली वस्ती दिसली. १०-१२ झोपड्या दिसत होत्या. एकदम हायसे वाटले. इथे पाणी आणि वाटाड्या नक्की मिळणार म्हणून उत्साहात झपाझप पाय उचलत त्या वाडीत पोचलो. ती नागशेतची धनगरवाडी होती.

बाप्यें मंडळी कोणीच दिसत नव्हती. एक आज्जीबाई आणि तिची सूनबाई एका झोपडीत भेटल्या. जवळच पाणी पण होते. त्यांना डेऱ्या घाटावाटेबद्दल विचारले.  आजीबाईंनी समोर डोंगररांगेत खुणेनी दाखवली. पण वाट दाखवायला यायची त्यांची तयारी नव्हती. तिथेच मग डबे उघडायचे ठरले. जेवण करून, पोटात आणि बाटल्यांमध्ये पाणी भरून निघायचे ठरले कारण मधे कुठेही पाणी मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे आजीबाईच्या पडवीत आम्ही डबे संपवले. त्यांच्या नातवांना आमच्याकडचा खाऊ दिला. त्यांनीही पाण्याचा हंडा आणून ठेवला. जेऊन, पाणी भरून निघेपर्यंत त्या वाडीतले एक मामा तयार झाले वाट दाखवायला. मग काय लगेच निघालो.

 

एक वाजला होता. जबरदस्त कचकचीत चांदणे पडले होते. जागोजागी पळस फुलला होता. सुरवातीला मोठे पठार होते. ते संपल्यावर वाट चढायला लागली. मधे मधे थोडीफार झाडी होती. चढ चांगलाच तीव्र होत चालला होता. त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी उंची गाठू लागलो होतो. कोकणातून वर येत असल्यामुळे, मधून मधून थंडगार वाऱ्याची झुळूक उत्साह टिकवून ठेवत होती. ह्या डोंगरावर एक डेऱ्यासारखा दिसणारा आकार आहे त्यामुळे ह्या वाटेला डेऱ्याघाट म्हणत असावेत. मधे भरपूर उंचावर आल्यावर गर्द झाडीत १० मिनिटे विश्राम केला. पाणी/electral/tang पिऊन ताजेतवाने होऊन परत चढायला सुरुवात केली.





आता खरी परीक्षेची घडी होती. इथपर्यंत आम्हाला वाट दाखवून मामा परत फिरले. इथून पुढे कातळात पावट्या खोदून वाट तयार केली आहे.  पावट्यांचा आधार घेत पुढे कसरत करत मार्गक्रमणा करावी लागते. ही संपूर्ण वाट क्वचितच वापरातली आहे. त्यामुळे माणसांचा वावर कुठेही आढळतं नाही. पावट्यांच्या वाटेने पुढे गेल्यावर वाटच मोडलेली दिसली. माती सुटल्यामुळे घसरडी झाली होती. बरं, होती ती ही सरळ नव्हती. घसरडी तीव्र चढाईची होती. चांगलीच दमछाक करणारी होती. इथे झाडेही अगदी विरळ होती त्यामुळे उन्हाचा त्रासही जाणवत होता. हा जो, वर चढणारा पॅच होता अगदी पावट्या सुरू झाल्या पासूनचा, खूप challenging होता, stressful होता, तो अतिशय काळजीपूर्वक पार करून वर पोचलो, तर वाटलं आता झालं, पोचलोच ट्रेकच्या end point ला. पण कसचं काय, अजुन एक दिड तासांची चाल होती.





आमच्यातले काही लोक पुढे गेले. आम्ही सावलीत मागच्या लोकांची वाट पाहत थांबलो. खालचा टप्पा थोडा अवघड होता त्यामुळे काळजी वाटत होती. बऱ्याच वेळाने भाऊ येताना दिसले. त्यांच्या बरोबर परत चढाईला सुरुवात केली. चढाई थोडीच राहिली होती. ती पार केली की पुढे लांबलचक पठार होतं. पुढे गेलेल्या लोकांनी लावलेल्या दिशादर्शक रीबिनी आणि खडूखुणांचा मागोवा घेत ४.३o वाजता मुळशी तालुक्यातील घुटके गावाजवळील आसनवाडीत पोचलो इथेच आमची बस थांबली होती.  वाहत्या नळावर फ्रेश होऊन, गरमागरम सूप, दही खिचडीवर ताव मारला आणि ६/६.१५ ला पुण्याकडे मार्गस्थ झालो. ९.३० वाजता चांदणी चौकात पोचलो. बाणेरहून मी आणि धनंजय बरोबर आलो होतो त्याच्या बाईकवर. आता बाईक पंक्चर झाली होती. पंक्चर काढून १०/१०.१५ ला घरी पोचलो.





बसमध्ये आणि रात्री झोपेत डेऱ्या घाटातील टप्पे काही केल्या डोळ्या समोरून हलत नव्हते. हा घाट फारसा वापरात नाही. गावकरी पण ह्याचा फारसा वापर करत नसावेत. जनावरांनाही इकडे चरायला आणत नसावेत कारण तश्या काही खणाखुणा बघायला  मिळत नाहीत. वाटेत पाणी कुठेही नाही. हा ट्रेक करताना एकट्या दुकट्याने न करता ग्रुप बरोबरच केलेला सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगले. असो, अजुन एका छान घाटवाटेची भर माझ्या ट्रेक लिस्ट मध्ये पडली ह्याचा खूप आनंद.

 

विवेक फाटक