Thursday, December 16, 2021

गोरखगड ट्रेक ३१.१०.२०२१

 

गोरखगड ट्रेक ३१.१०.२०२१

 

सदानंद हॉटेल बाणेर समोर, हायवेवर आमचा शेवटचा पीकअप घेत Zenith Odysseys ची बस पुढे एक्स्प्रेस वे लागली तेव्हा सकाळचे ६/६.१५ झाले होते. खिडकीतून येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे लगेचच मस्त डोळा लागला. पुढे खोपोलीला एक्झीट घेऊन बस कर्जत मुरबाड रस्त्याला लागली. देहरी हे गोरखगडाच्या पायथ्याचे गाव. गावात पोचल्या बरोबर गोरखगड आणि मच्छिंद्रगड यांचे दोन अजस्त्र सुळके आपले लक्ष वेधून घेतात. गावात  चहानाष्टा घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली. एव्हाना ९ वाजले होते. उन्हे तापायला सुरुवात झाली होती. 



ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर सह्याद्रीची रांग खूपच अजस्त्र वाटते. माळशेज घाट, जीवधन- नाणेघाट, आहुपे घाटातील अजस्त्र सुळके गगनाला भिडलेले दिसतात. आहुपे घाट आणि भीमाशंकरचे जंगल म्हणजे निसर्गाचे अद्भुत लेणं. ह्या जंगलातले गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे दोन उंच सुळके सह्यप्रेमींना नेहमीच साद घालतात. 

गडावर जाणारी वाट अतिशय दाट जंगलातून वर वर चढत जाते त्यामुळे उन्हाचा त्रास जाणवत नाही. ही खडी चढण चढताना चांगलीच दमछाक होते, खूपच घामाघूम व्हायला होते. पण थोडे थोडे थांबत, थोडे पाणी पीत दाट झाडांमधून दिसणारी गोरखगडाची विविध रूपे बघत आपण वर चढत असतो. घामाघूम झालेलो असताना, येणारी गार वाऱ्याची झुळूक खूप सुखावून टाकते, वर चढायला नवा हुरूप देते. 



तास सव्वा तासांच्या चढाईनंतर आपण गोरखनाथांच्या मंदिरा जवळ येतो. येथे वनखात्याने ह्या गडाबद्दल माहितीवजा लावलेले एक दोन बोर्ड बघायला मिळतात. इथून पुढे आपण काही अर्धवट कातळ पायऱ्यावरून/ तर काही रॉक पॅचेस पार करत गडाच्या दरवाज्या पर्यंत येतो.  इथे एक छोटीशी गुहा आहे. त्या गुहेवरून एक मध्यमश्रेणीचा छोटासा रॉक पॅच पार करत, वर जायला वाट आहे. वर अतिशय मोठी थंडगार गुहा आहे. एखादा मोठा ग्रुप सुध्दा इथे रात्री मुक्काम करू शकतो. गुहे जवळच पाण्याची तीन टाकं आहेत. पैकी दोन मधे खूप शेवाळे आहे तर तीन पैकी पहिल्या टाक्यातील पाणी स्वच्छ आणि पिण्यायोग्य आहे. पाणी अतिशय सुमधुर आणि थंडगार आहे. गुहेत थोडावेळ थांबून, अगदी जवळ दिसणाऱ्या मच्छिंद्रगडाचे यथेच्छ फोटो काढले. अतिशय रमणीय जागा आहे ही.




आता वर जायचा शेवटचा टप्पा थोडा अवघड आहे. त्यामुळे आमच्या पैकी दोघे जण गुहेतच थांबले. आम्ही आमच्या सॅक्स तिथेच ठेवल्या. वर जाणाऱ्या ह्या टप्यावर निमुळत्या सरळसोट पायऱ्या आहेत, काही ठिकाणी तुटलेल्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला खोबण्या केलेल्या आहेत. त्याचा आधार घेत आपण वर चढतो. एका बाजूला उभा कातळ आहे तर दुसऱ्या बाजूला दरी. त्यामुळे काळजीपूर्वक वर चढावे लागते. उंचीची भीती किंवा दृष्टिभय असणाऱ्यांसाठी कठीण आहे.





हा टप्पा अवघड असला तरी तो चढल्या शिवाय गडमाथ्यावरून दिसणाऱ्या अप्रतिम आणि अफाट  निसर्गसौंदर्याचा अनुभव घेता येणार नाही. गडमाथ्याचा घेरा फार मोठा नाहीये. वर शंकराचे एक छोटेसे देखणं मंदिर आहे, समोर नंदी आहे. मंदिरा मागून जो काही सह्याद्रीचा नजारा आहे त्याच्या शब्द नाहीत. आकाशाला गवसणी घालणारे बेलाग कडे, सिध्दगड, मच्छिंद्रगड, आहुपे घाट, नाणेघाट, भीमाशंकरचे घनदाट जंगल आणि निशब्द शांतता. इथे खूप वेळ घालवावासा वाटत होता पण भरपूर फोटोग्राफी करून खाली उतरायला घेतले. हा टप्पा चढण्यापेक्षा उतरायला अवघड आहे. अतिशय काळजीपूर्वक उतरून आम्ही पुन्हा खाली गुहे जवळ आलो. रिकाम्या बाटल्या भरून घेतल्या, सॅक पुन्हा चढवून उतरायला सुरुवात केली. एक वाजून गेला होता. सूर्यदेव आग ओकत होते( ऑक्टोबर हीट). कातळटप्पे उतरताना, कातळ चांगलाच गरम झाल्यामुळे हात खूपच भाजत होते.  त्यातच एक कुत्र्याचे पिल्लू वर कसे काय आले कोण जाणे, त्याला वर काही खायला मिळणार नाही म्हणून आमच्यातील श्वानप्रेमींनी त्याला खाली गोरखनाथ मंदिरापर्यंत उचलून आणून सोडले. त्याला घेऊन उतरणे अवघड होत होते. पाठीवरच्या सॅक मधे तोंड बाहेर ठेऊन बसवायचा प्रयत्न पण झाला. पण ते पिल्लू त्यात बसेना. खाली मंदिरा जवळ त्याला खायला प्यायला दिले. आम्हीही पाणी पिऊन ताजेतवाने झालो. दुपारचे दोन वाजले होते. 




आता इथून नॉन स्टॉप उतरायचे ठरवले. कारण आता बहुतेक संपूर्ण उतारच होता आणि दाट जंगल होते त्यामुळे उन्हाचा त्रास नव्हता. त्यामुळे सुसाट निघालो. पिल्लू पण आमच्या पाठोपाठ उतरत होते. उतरताना काहींची घसरगुंडी पण झाली. शेवटच्या टप्प्यावर थोडी वाट चुकलो पण खाली मेन रोड दिसत होता, गाड्यांचे आवाज येत होते. त्यामुळे थोडा टाईम पास होत ३ वाजता गावात पोचलो. पिल्लाला पण गावात सोडले. फ्रेश होऊन मस्त जेवण केलं आणि ४ वाजता पुण्याकडे मार्गस्थ झालो. वाटेत कर्जतला प्रसिद्ध वडापाव चहा घेऊन पुण्यात घरी ९.३० पोचलो.







No comments:

Post a Comment