सह्याद्रीतील घाटवाटेचे ट्रेक करायला मला खूप आवडतात. म्हणून अजुन एका घाटवाटेचा ट्रेक करायची संधी लगेचच दोन आठवड्यात आली. हा ट्रेक कर्जत तालुक्यातील जांब्रुंग गावातून सुरू होऊन, चढाईचा पहिला टप्पा आधी शिडीच्या वाटेने आणि नंतर वाजंत्री घाटवाटेच्या मार्गाने वर खेतोंबा मंदिरा जवळ संपतो. संपूर्ण घाटवाट जबरदस्त दमावणाऱ्या चढाईची आहे. पण वाट खूप निसर्ग संपन्न आहे, दाट जंगलातून जाते त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही.
वाटेत एक बऱ्यापैकी thrilling रॉकपॅच पार करावा लागतो. थोडासाच traverse आहे पण खूप काळजी पूर्वक पार करायला लागतो. आम्ही आधी पार केला पण नंतर येणाऱ्या काही जणांसाठी दोर लावावा लागला. जाताना तीन शिड्या पार कराव्या लागतात.
मधे जंगलात एका ठिकाणी असंख्य फुलपाखरं दिसली.
इथे
जवळपास अर्धा पाऊण तास थांबून, पोटपूजा करून भीमाशंकरच्या मार्गाने थोडे पुढे गेलो.
जांबरुंग सोडल्यानंतर कुठेही पाणी नाही. आम्ही khetoba नंतर पाण्यासाठी बरीच शोधाशोध
केली पण सगळी कडचे पाणी आटले होते. त्यामुळे हा ट्रेक करताना कमीतकमी ३ लिटर पाणी असणे
आवश्यक आहे.
खाली राजापे गावात उतरणारी वाट अतिशय thrilling आहे. खूप काळजीपूर्वक उतरावी लागते. खूप मोठमोठ्या (boulders) दगडांमधून मार्ग काढत वाट उतरावी लागते. खूप Loose rocks आहेत त्यामुळे फार काळजी घ्यावी लागते उतरताना. पण इथून दिसणारे सह्याद्रीचे रौद्र रूप निश्चितच अनुभव घेण्यासारखे आहे. उंच उंच आकाशाला गवसणी घालणारे रौद्र कडे, खाली नागमोडी खोल उतरणारी मोठमोठ्या दगडांमधून मार्ग काढणारी वाट, समोर दिसणारी खोल दरी आणि दरी पलीकडे काळा काभिन्न कातळ, पुढे स्वागताला भव्य पदरगड. खाली उतरायला २/२.३० तास लागतात. अर्ध्या अधिक उतराई नंतर पुढची पायवाट जबरदस्त घसार्याची आहे. पण वाटेच्या दोन्ही बाजूने असलेली कारवी, ही वाट उतरायला खूप मदत करते. कारवीच्या झाडांना पकडत पकडत आम्ही ही वाट लीलया उतरलो.
खाली आल्यावर एका ठिकाणी ओढ्याला पाणी होते. आधी
मस्त गार पाण्याने चेहरा धुतला. डोक्यावर थोडे पाणी ओतले. मग जरा छान थंड वाटले. पाण्याची
बाटली भरून घेतली आणि मनसोक्त पाणी प्यायलो तेव्हा जरा आत्मा शांत झाला.
आता
राजापेची धनगरवाडी अर्ध्या तासावर आणि वाट जंगलातून पण प्लेन होती. पाय आता चांगलेच
बोलायला लागले होते. झपाझप पाय चालवत धनगरवाडीत उतरलो तेव्हा ४ वाजले होते. शेंडगे
भाऊंनी गार पाण्याची बादली दिली आणि आम्ही मस्त फ्रेश झालो. स्वयंपाक झालेला होता.
मस्त पैकी पिठलं भाकरी चापून वर गरमागरम चहा पिऊन वाडीत एक चक्कर टाकली. बाकीची मंडळी
अजुन यायची होती. धनगरवाडीत पाचच घरं होती. पण मस्त झाडा झुडपांनी वेढलेली होती. तिथेच
सावलीत, समोर दिसणारा पदरगड न्याहाळत मित्रांबरोबर गप्पा मारत तासभर आराम केला. तोपर्यंत
सगळी मंडळी आली होती. ६ वाजता आमच्या बसने पुण्याकडे रवाना झालो. वाटेत लोणावळ्याला
लागणाऱ्या ट्रॅफिकची भीती होती पण रविवार असून अजिबात ट्रॅफिक लागले नाही त्यामुळे
१०वाजता निर्धारित वेळे आधीच पुण्यात पोचलो.

























खुप छान वर्णन.
ReplyDelete